खरीप हंगामातील पीक खरेदीला सुरवात; शेतकऱ्यांना १३ हजार कोटींचे वितरण 

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 17 October 2020

सरकारने शेतकऱ्यांना १३ हजार १२८.१२ कोटी रुपयांची रक्कम किमान आधारभूत किमतीपोटी दिल्याचे आज केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आले.

नवी दिल्ली - खरीप हंगामातील पीक खरेदीला सुरवात झाली असून आतापर्यंत सुमारे सत्तर लाख मेट्रिक टन भात-खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीपोटी सरकारने शेतकऱ्यांना १३ हजार १२८.१२ कोटी रुपयांची रक्कम किमान आधारभूत किमतीपोटी दिल्याचे आज केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आले. नव्या कृषिविषयक सुधारणा कायद्यांमुळे किमान आधारभूत किंमत प्रणाली बंद होणार असल्याच्या शंकेचे निराकरण करण्यासाठी सरकारने ही माहिती जाहीर केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अन्न महामंडळ आणि इतरही सरकारी धान्यखरेदी संस्थांच्या मार्फत ही खरेदी करण्याचे काम चालू झाले आहे. १५ ऑक्‍टोबरपर्यंत या संस्थांकडून ६९.५३ लाख मेट्रिक टन भात-खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. खरीप हंगाम खरेदीच्या मालिकेतच सरकारी संस्थांनी आतापर्यंत ४१.६७ लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांची खरेदी केली आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगण, गुजरात, हरियाना व अन्य काही राज्यांमध्ये ही खरेदी करण्यात आली. १५ ऑक्‍टोबरपर्यंत सरकारी संस्थांनी ७२३.७९ मेट्रिक टन मूग व उडीद यांची खरेदी केली. ६८१ शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला व सरकारने त्यांना किमान आधारभूत किमतीनुसार ५.२१ कोटी रुपयांची रक्कम चुकती केली. कापसाची खरेदीही १ ऑक्‍टोबरपासून सुरु झाली आहे.१५ ऑक्‍टोबरपर्यंत कापूस महामंडळाकडून १ लाख १८ हजार ६४ गाठींची खरेदी करण्यात आली. २४ हजार १ शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला व त्यांना ३३३५३.६२ लाख रुपयांची रक्कम चुकती करण्यात आली. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government provided Rs 13128 crore to the farmers as minimum basic price