बिहार, यूपी, हरियानातही बदलली होती रातोरात सरकारे

वृत्तसंस्था
Sunday, 24 November 2019

उत्तर प्रदेशात ‘नेताजी’ पडले भारी!
उत्तर प्रदेशात मुलायमसिंह यादव ऊर्फ नेताजी यांनी १९८९ मध्ये केलेल्या राजकीय खेळीमुळे अजितसिंह यांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न भंगले आणि यादव मुख्यमंत्री झाले होते. १९८० च्या दशकात या राज्यात जनता पक्ष, जन मोर्चा, लोकदल (अ) आणि लोकदल (ब) यांच्या आघाडीला यश मिळाले होते. ४२५ सदस्यांच्या विधानसभेत या आघाडीने २०८ जागा जिंकल्या होत्या आणि बहुमतासाठी आणखी १४ आमदारांची गरज होती. मुलायमसिंह यादव आणि अजितसिंह यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी चुरस असली, तरी पसंती अजितसिंह यांच्या नावाला होती. मुलायमसिंह यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याचे निश्‍चित झाले होते. तशी तयारीही सुरू झाली होती. नेताजी माघार घेत नसल्याने गुप्त मतदानाने निर्णय करण्याचे ठरले. मुलायमसिंह यांनी अजितसिंह यांच्या गोटातील ११ आमदार फोडून आपल्याकडे आणले. गुप्त मतदानात अजितसिंह यांचा पाच मतांनी पराभव झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून मुलायमसिंह यादव यांनी पाच डिसेंबर १९८९ रोजी पहिल्यांदा शपथ घेतली.

पाटणा/लखनौ/नवी दिल्ली - राष्ट्रपती राजवट असलेल्या महाराष्ट्रात रातोरात झालेल्या राजकीय हालचालींमुळे चित्र बदलले असले, तरी देशाच्या राजकारणात अशा घटना नव्या नाहीत. बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाना ही महत्त्वाची राज्ये अशा घडामोडींची साक्षीदार आहेत.

केंद्रातील एनडीए सरकारबरोबर काडीमोड घेऊन बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाबरोबर (राजद) सरकार स्थापन करणाऱ्या मुख्यमंत्री आणि जेडीयूचे नेते नितीशकुमार यांनी अडीच वर्षांपूर्वी २६ जुलै २०१७ रोजी राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना असाच धक्का दिला होता. नितीशकुमार यांनी राजदबरोबर वीस महिने सरकार चालविले. पण, नितीशबाबूंनी एका रात्रीत काडीमोड घेऊन राजदला जमिनीवर आणले. बिहारध्ये लालूप्रसादांचा मुलगा तेजस्वी उपमुख्यमंत्री होता. रेल्वे निविदांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप त्याच्यावर झाला होता आणि या प्रकरणात सीबीआयने तेजस्वी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केल्यावर तसेच लालूप्रसाद यांच्या निवासस्थानी छापे पडल्यावर नितीशकुमार यांनी जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठक घेऊन राजदबरोबरची आघाडी तोडण्याचा निर्णय केला आणि राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामाही दिला. पाठोपाठ काही तासांत बिहारमध्ये जेडीयू-भाजपचे नवे सरकार अस्तित्वातही आले.

हरियानात काँग्रेसचा झटका
हरियानात १९८२ मध्ये भाजप-लोकदल आघाडीला काँग्रेसने झटका दिला होता. सरकार स्थापनेचे आघाडीचे प्रयत्न फोल ठरवत काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. २१ मे ते २३ मे १९८३ या काळात हरियानात या घडामोडी घडल्या होत्या. लोकदलाचे नेते चौधरी देवीलाल आणि भाजपचे नेते डॉ. मंगल सेन यांनी हरियानाचे तेव्हाचे राज्यपाल गणपतराव तपासे यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता. ९० पैकी ४६ आमदारांचा आघाडीला पाठिंबा असल्याचा दावा करून या दोघांनी तसे पत्र राज्यपालांना दिले होते. तपासे यांनी, आमदारांच्या स्वाक्षऱ्यांची खातरजमा करण्यासाठी २४ मेपर्यंत थांबण्यास या दोघांना सांगितले होते. पण, २३ मे रोजीच काँग्रेसचे नेते चौधरी भजनलाल यांनी पक्षाच्या ३६ आमदारांसह मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. लोकदल आणि भाजपने चंडीगडच्या राजभवनात आमदारांना हजर करूनही उपयोग झाला नाही. या निवडणुकीत लोकदलाने ३१ आणि भाजपने सहा जागांवर विजय मिळविला होता. काँग्रेसला ३६ आणि जगजीवन राम यांच्या पक्षाला तीन जागा मिळाल्या होत्या आणि १६ जागांवर अपक्ष विजयी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governments overnight had also changed in Bihar UP Haryana