मास्क न घालणाऱ्यांना घडणार अद्दल; होणार तब्बल १ लाखांचा दंड

कार्तिक पुजारी
Thursday, 23 July 2020

झारखंडमध्ये कोरोना संबंधी नियम न पाळणे आणि मास्क न घालणाऱ्यांना १ लाख रुपयांचा दंड आणि २ वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. झारखंड सरकारने बुधवारी संक्रमित रोग अध्यादेश २०२० पारित केला आहे.

रांची- झारखंडमध्ये कोरोना संबंधी नियम न पाळणे आणि मास्क न घालणाऱ्यांना १ लाख रुपयांचा दंड आणि २ वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. झारखंड सरकारने बुधवारी संक्रमित रोग अध्यादेश २०२० पारित केला आहे. यात म्हटलं आहे की, सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन करणारे आणि मास्क न घालणारे यांना १ लाख रुपये दंड आकारला जाईल. शिवाय नियमांचे पालन न करणाऱ्याला दोन वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. मात्र, गुरुवारी या अध्यादेशाची अंमलबजावणी होताना दिसली नाही. अनेक लोक रस्त्यावर मास्क न घालता वावरताना दिसत होते.

बापरे! मास्क न घालणाऱ्यांना हुकूमशाहा किम जोंग उन देणार ही क्रूर शिक्षा
झारखंडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, कोरोना रुग्णांना सरकारी रुग्णालयात जागा मिळत नाहीये. अशावेळी सरकारने खाजगी रुग्णालय आणि इतर बँक्केट हॉलचा वापर आयसोलेशन वार्ड बनवण्यासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला रांची स्टेनश रोडवर राहणाऱ्या नागरिकांनी विरोध केला आहे.

लोकांचे म्हणणे आहे की, आयसोलेशन वार्ड रहदारीच्या परिसरात बनवला जात आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. रांचीच्या स्टेशन रोड परिसरात राहणाऱ्या २०० कुटुंबीयांनी सरकारच्या निर्णयाचा विरोध करत आयसोलेशन वार्ड दुसरीकडे बनवण्याची मागणी केली आहे.

भारतात कोरोनाचा उद्रेक वाढतोय; गेल्या 24 तासांत...
आरोग्य मंत्रालयाच्या गुरुवारच्या आकडेवारीनुसार, झारखंडमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६४८५ पर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत ६४ लोकांनी आपला जीव गमावला आहे. ३०२४ लोकांनी कोरोना विषाणूवर यशस्वीरित्या मात केली आहे, तर सध्या राज्यात २२९७ सक्रीय प्रकरणे आहेत. 

दरम्यान, भारतात कोरोना महामारीनेअक्षरश: थैमान घातले आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. देशात एकूण रुग्णसंख्या 12,38,635 वर पोहोचली आहे, तर सध्या 4,26,167 सक्रिय रुग्ण आहेत. आत्तापर्यंत 7,82,606 रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. देशात आत्तापर्यंत 29,861 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शिवाय गेल्या काही दिवसांपूर्वी बांधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या 24 तासांत 45,720 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. याशिवाय तब्बल 1129 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: govt announces Rs 1 lakh fine for not wearing masks