GPS चा स्वदेशी पॅटर्न ‘गगन’

संरक्षणापासून ते दळणवळणा पर्यंत भारताला आत्मनिर्भर करणार
GPS Gagan satellite navigation
GPS Gagan satellite navigation sakal

पुणे : राजस्थानच्या किशनगड विमानतळावर गुरुवारी उतरलेल्या ‘इंडिगो’च्या विमानाने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आपल्या हातातील मोबाईलपासून ते विमानाच्या संचलनासाठी वापरल्या जाणाऱ्या परदेशी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) या दिशानिर्देशन प्रणाली छेद देत, स्वदेशी ‘गगन’ प्रणालीचा यशस्वी वापर इंडिगोने केला आहे. संरक्षणापासून ते दळणवळणा पर्यंत भारताला आत्मनिर्भर करणारी नक्की ही प्रणाली काय आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा.

काय आहे गगन?

उपग्रहांच्या मदतीने दिशानिर्देशन करणाऱ्या या प्रणालीची निर्मिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) केली आहे. एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या मदतीने राबविलेला हा प्रकल्पाचे पूर्ण नाव ‘जीपीएस एडेड जियो-ऑगमेंटेड नॅव्हीगेशन’ अर्थात गगन असे आहे.

गगनची आवश्यकता का?

युद्ध किंवा आपत्कालीन परिस्थितीत स्वदेशी दिशानिर्देशन प्रणाली असणे गरजेचे आहे. जागतिक स्तरावरील जीपीएस प्रणालीवर अवलंबित्व कमी करणे सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे. जगात अमेरिका, युरोप आणि जपान या देशाकडे अशी प्रणाली आहे. आता भारत चौथा देश बनला आहे.

गगनची सुरवात केंव्हा झाली?

२००८ मध्ये ७७४ कोटी रुपयांचा या प्रकल्पाची सुरवात झाली. जीसॅट-८, जीसॅट-१०, जीसॅट-१५ या तीन उपग्रहांचे प्रक्षेपण इस्रोकडून करण्यात आले आहे.

काम कशी करते?

गगनसाठी देशभरात विविध ठिकाणी संदर्भ केंद्र (रेफरन्स) स्थापित केली आहे. ज्यांना इंडियन रेफरन्स स्टेशन म्हणून ओळखले जाते. उपग्रहांकडून आलेल्या माहितीचे संकलन ही केंद्रे करतात. या रेफरन्स स्टेशनच्याही पुढे काही मास्टर स्टेशन्स आहेत. जे रेफरन्स स्टेशन आणि जीपीएसचा समन्वय साधतात. त्यानंतर इंडियन अपलींक स्टेशन उपग्रहांना दिशानिर्देशनासंबंधीची माहिती पुरवतात. त्या आधारावर जागा आणि दिशानिर्देशन पूर्ण केले जाते.

गगन प्रणालीचा उपयोग?

समुद्रातील जहाजांपासून आकाशातील विमानांच्या दिशानिर्देशनासाठी वापर. तसेच मोबाईल, रेल्वे, पर्यटन आदी क्षेत्रांमध्येही या प्रणालीचा वापर शक्य आहे. कृषी आणि संशोधन क्षेत्रासाठीही ही प्रणाली उपयुक्त आहे. भारतासह शेजारील देशांनाही या प्रणालीचा उपयोग करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com