राजस्थान उच्च न्यायालयाचा सचिन पायलट यांना मोठा दिलासा

कार्तिक पुजारी
Friday, 24 July 2020

राजस्थान उच्च न्यायलयाने सचिन पायलट यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने शुक्रवारी आपला निर्णय देताना सध्याच्या स्थितीला कायम ठेवलं आहे

जयपूर - राजस्थान उच्च न्यायलयाने सचिन पायलट यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने शुक्रवारी आपला निर्णय देताना सध्याच्या स्थितीला कायम ठेवलं आहे. न्यायालयाने राजस्थान विधानसभा अध्यक्षांची नोटीस अमलात न आणण्याचा आदेश कायम ठेवला आहे. त्यामुळे सचिन पायलट आणि अन्य १९ आमदारांवर सध्या तरी अयोग्यत्येची कोणतीही कारवाई होणार नाही. 

राजस्थानात राजकिय नाट्य सुरुच; लवकरच विधानसभा अधिवेशन
राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राजस्थान विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. न्यायालयाने अध्यक्ष  सी.पी. जोशी यांची मागणी फेटाळून लावत उच्च न्यायालयाला आपला निर्णय देण्यास मोकळे केले होते. त्यानंतर आज उच्च न्यायालयाने निकाल देत सचिन पायलट गटाला दिलासा देत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

सचिन पायलट गटाने केंद्रालाही पक्षकार करुन घेण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने त्यांची ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारही पक्षकार बनलं आहे. यामुळे केंद्रीय कायदा मंत्रालय आपली कायदेशीर बाजू मांडू शकणार आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी सचिन पायलट यांच्यासह १९ आमदारांना अपात्र का ठरवले जाऊ नये, अशी नोटीस बजावली होती. या नोटीसीविरोधात पायलट गटाने राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने यावर सुनावणी करताना अध्यक्ष जोशी यांना २४ जूलैपर्यंत कोणताही निर्णय न घेण्याचे आदेश दिले होते. राजस्थान उच्च न्यायालयाच्या या आदेशाला अध्यक्ष जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पायलट गटानेही न्यायालयाचे दार ठोठावले. अध्यक्षांच्या याचिकेवर न्यायालयाने गुरुवारी सुनावणी केली. अपात्रतेची नोटीस पाठवण्यात आलेल्या आमदारांच्या याचिकेवर उच्च न्यायालय निर्णय देऊ शकते, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षेतेखालील खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी केली होती. 

भारतातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग ब्राझीलपेक्षाही अधिक
दरम्यान, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. गेहलोत यांच्या गटाने सध्या त्यांच्याकडे १०२ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला असून पायलट यांच्या गटाकडे १९ आमदारांचे बळ आहे. पायलट यांचा गट अपात्र ठरल्यास गेहलोत यांना बहुमताची लढाई जिंकणे अधिक सोपे होणार आहे. पायलट गटाचा विजय झाल्यानंतर मात्र ते गेहलोत यांच्या अडचणी आणखी वाढवू शकतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Great relief to Sachin Pilot of Rajasthan High Court

Tags
टॉपिकस
Topic Tags: