कोरोनाच्या संकटात पोलिसांचे मानवतेसाठी मोठं काम; पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 4 September 2020

पोलिसांचे सामाजिक कार्य पाहून नागरिकांनीही त्यांना प्रोत्साहित केल्याचं मोदी म्हणाले

नवी दिल्ली- खाकी वर्दीचा सन्मान राखण्यासाठी आपण सदैव सज्ज राहू, अशा भावना मनात बाळगायला हवी. तिरंगा ध्वजएवढाच मान सन्मान पोलिसांच्या खाकी गणवेशाला द्यायला हवा. कोरोना काळातील सामाजिक कार्य पाहून लोकांचा खाकी वर्दीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीतील २०१८ च्या बॅचच्या आयपीएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे आज दिक्षांत संचलन झाले. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते.

NEET -JEE नियोजित वेळेतच होणार; सर्वोच्च न्यायालयाने 6 राज्यांची याचिका फेटाळली

पंतप्रधान मोदी म्हणाले, आजघडीला आपण पोलिस कर्मचाऱ्यांना विविध भूमिकेत पाहत आहोत. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात पोलिस कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. लोकांच्या मनात पोलिसांविषयी अनामिक भिती होती. पोलिस म्हणजे करड्या शिस्तीचा, दंड ठोठावणारा, दंडुके घेऊन मागे लागणारा, अशी प्रतिमा होती. परंतु कोरोनासारख्या संकट काळात पोलिसांनी मानवतेच्या दृष्टीने मोठे काम केले आहे. पोलिसांचे सामाजिक कार्य पाहून नागरिकांनीही त्यांना प्रोत्साहित केले आणि कौतुक केले. फुटपाथवरच्या लोकांना पोलिसांनी अन्नाची पाकिटे वाटली. त्यामुळे लोकांच्या मनातील पोलिसांविषयीची प्रतिमा बदलली आहे. कोरोनाच्या काळात खाकी वर्दीतील मानवतेचा अंश लोकांना संघटित रुपाने पाहवयास मिळाला.

किरण श्रुती सर्वोत्तम प्रशिक्षणार्थी

आयपीएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा ११ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर दीक्षांत सोहळा होतो. अकादमीचे संचालक अतुल करवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ महिलांसह १३१ आयपीएस प्रशिक्षणार्थी अधिकारी दिक्षांत संचलनात सहभागी झाले होते. या वेळी सर्वोत्तम प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी म्हणून डी.व्ही. किरण श्रुती यांची निवड झाली. या निवडीबद्धल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांना तमिळनाडू केडर मिळाले आहे. महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी काम करत देशसेवा करु, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The great work of the police for humanity in the Corona crisis said Prime Minister Modi