भुईमूगाच्या पोत्यांमध्ये खडे आणि चिखल 

महेश शहा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

अहमदाबाद : भुईमूग खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्याने गुजरातमधील विजय रुपानी सरकार अडचणीत आले आहे. सरकारने एका शेतकरी सहकारी संस्थेकडून खरेदी केलेल्या पोत्यांमध्ये भुईमुगाबरोबरच चिखल आणि खडे असल्याचे उघड झाले आहे. 

राजकोट जिल्ह्यातील जेटपूर येथील एका खासगी गोदामात खरेदी केलेल्या 'भुईमुगा'ची तीस हजार पोती सापडली आहेत. राज्याचे कृषिमंत्री आर. सी. फालदू यांनी या प्रकरणी मोठा गैरव्यवहार झाल्याचे मान्य केले असून, दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे. सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. भुईमुगाच्या 35 किलोच्या प्रत्येक पोत्यामध्ये 22 किलो खडे आणि चिखल असल्याचे आढळून आले आहे. 

भाजपचा एक नेता आणि सहकारी संस्थेच्या स्थानिक अधिकाऱ्याने संगनमत करून हा गैरव्यवहार केल्याचा आरोप होत आहे. गुजरात राज्य सहकारी कापूस फेडरेशन लि. (गुजकॉट) या संस्थेच्या अधिकाऱ्यांचाही यात सहभाग असल्याचा अंदाज आहे. 'नाफेड'ने 900 रुपये या किमान आधारभूत किमतीला भुईमूग खरेदी करण्याचे अधिकार 'गुजकॉट'ला दिले आहेत. सरकारी लिलावात भुईमूग खरेदी केल्यानंतर माल घेण्यास आलेल्या व्यापाऱ्यांना ही भेसळ दिसून आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. 

Web Title: Groundnut sacks stone and muds