Gujarat Assembly Election : रिंगणात नसतानाही पटेलांचे ‘वजन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Assembly Election

Gujarat Assembly Election : रिंगणात नसतानाही पटेलांचे ‘वजन’

मेहसाणा : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आपल्या मेहसाना मतदारसंघात भाजपचा प्रचार करत आहेत. पाटीदार समुदायात प्रभाव असलेल्या पटेल यांना यंदाच्या निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिली नाही. मात्र, मेहसाणात पटेल यांची लोकप्रियता कायम आहे. गेल्या ३२ वर्षांपासून भाजप उमेदवार मेहसाणातून विजयी होत आहे. सहासष्टवर्षीय नितीन पटेल यांनी २०१७ मध्ये मेहसाना मतदारसंघातून विजय मिळविला होता.

राज्यभरात भाजपच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांची छायाचित्रे आहेत. मेहसाणात मात्र या सर्वांबरोबर पटेल यांचेही छायाचित्र दिसते. हा त्यांच्या लोकप्रियतेचा पुरावाच. मेहसाणातून भाजपने पक्षाचे शहराध्यक्ष मुकेश पटेल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. मात्र, त्यांच्यावर नितीन पटेल यांचाच मोठा प्रभाव आहे.

मेहसाणाचा गड राखण्यात यश

२०१७ मध्ये पाटीदार समुदायाच्या तीव्र आंदोलनामुळे मेहसाणाकडे सर्वांचे लक्ष गेले. या आंदोलनामुळे गेल्या निवडणुकीत भाजपला फटका बसला. मात्र, नितीन पटेल यांच्यामुळे मेहसाणाचा गड राखण्यात पक्षाला यश आले. जिल्ह्यातील सातपैकी ५ जागांवर भाजपने विजय मिळविला. तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळात नितीन पटेल यांचे दुसऱ्या क्रमांकाचे स्थान होते. त्यानंतर रुपानी मुख्यमंत्री असताना ते उपमुख्यमंत्री होते.