राज्य-मिती : गुजरात : अमली पदार्थांच्या तस्करीचा धुमाकूळ

गुजरात आणि अमली पदार्थांची होणारी तस्करी हे अनादी काळापासूनचे नाते आहे. याचे कारण शेजारील पाकिस्तान आणि इराण, अफगाणिस्तान हे देश आहेत.
Drugs Smuggling by Drone
Drugs Smuggling by DroneSakal

अमली पदार्थांच्या तस्करांसाठी `गोल्डन क्रिसेल’ असलेल्या ‘इराण-अफगाणिस्तान आणि पाकिस्तान’ मार्फत जगभरातील अमली पदार्थांच्या ऐंशी टक्के अमली पदार्थांची तस्करीसाठी गुजरातच्या किनारपट्टीचा वापर केला जात आहे, हे वेळोवेळी उघड झाले आहे. गेल्या चार वर्षात गुजरातमध्ये सुमारे दहा हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या प्रश्नाकडे राष्ट्रीय सुरक्षा म्हणून पाहिले जाण्याची गरज आहे.

गुजरात आणि अमली पदार्थांची होणारी तस्करी हे अनादी काळापासूनचे नाते आहे. याचे कारण शेजारील पाकिस्तान आणि इराण, अफगाणिस्तान हे देश आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीसाठी हे तिन्ही देश म्हणजे ‘गोल्डन क्रिसेल’ असे म्हटले जातात. जगभरात अमली पदार्थांचा जो व्यापार चालतो, त्यातील ऐंशी टक्के अमली पदार्थ हे या ‘गोल्डन क्रिसेल’मधून जगभर पाठविले जातात. ते पाठविण्यासाठी तस्करांना सर्वात सोयीचा मार्ग म्हणजे पाकितानलगतची आपली राजस्थान, पंजाबची सीमा आणि गुजरातची किनारपट्टी ही आहे.

एकेकाळी नशेमुळे एक संपूर्ण पिढी पंजाबमध्ये बरबाद झाल्यानंतर तेथील सरकारने कडक धोरण स्वीकारल्याने तेथे बऱ्यापैकी आळा बसला आहे,मात्र गुजरातमधून होणारी तस्करी पूर्णपणे थांबलेली नाही, हेही तेवढेच खरे. अमली पदार्थांची तस्करी रोखण्याची वर्षातून एखादी कारवाई होते, मात्र दरम्यानच्या काळात छोट्यामोठ्या प्रमाणात तस्कर स्थानिकांच्या मदतीने आपला हेतू साध्य करत असावेत असे म्हणणे चुकीचे ठरू नये, हेच गुजरातमध्ये नुकत्याच सापडलेल्या तीन हजार कोटींच्या अमली पदार्थांच्या कंटनेरवरून सिद्ध झाले आहे.

गुजरात किनारपट्टीमार्गे अमली पदार्थांचा सर्वात मोठा साठा जप्त करण्याची कारवाई २०१३ मध्ये झाली होती. मात्र २०१८नंतर अमली पदार्थांच्या तस्करीसाठी गुजरातची किनारपट्टी जणू अंगणच ठरली आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर साठा जप्त करण्यात येत आहे. हा सर्व साठा तस्करांचा असला तरी खुद्द गुजरातमध्येही भरूच, अंकलेश्वर येथे ‘केमिकल’च्या नावाखाली अमली पदार्थ तयार करणारे कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

यावरून अमली पदार्थ केवळ बाहेरूनच येतात असे नाही, तर गुजरातमध्येही त्याने भक्कम पाय रोवले आहेत. बाहेरील तस्करांचा यात हात असल्याचेही मानण्यात येत आहे. गेल्या काही वर्षातील वाढलेल्या अंमलीपदार्थविरोधी मोहिमा या आपल्या सुरक्षा यंत्रणांचे एकत्रित यश असले तरी गुजरात किनारपट्टीचा वापर तस्करांसाठी आपण पूर्णपणे का बंद करू शकलो नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

गेल्या चार ते पाच वर्षातील घटनांवर नजर टाकल्यास अंमली पदार्थांची तस्करी गुजरातमार्गे वाढलेली दिसून येते. १५ नोव्हेंबर २१ ला मोरबी बंदरातून सहाशे कोटींचे, १६ सप्टेंबर २०२१ला मुंद्रा बंदरातून तीन हजार कोटींचे, १० नोव्हेंबर २०२१ ला द्वारका बंदरातून अडीचशे कोटींचे, २३ डिसेंबर २०२१ ला पोरबंदर बंदरातून दीडशे कोटींचे हेरॉइन पकडण्यात आले आहे.

१३ फेब्रुवारी २२ ला अरब सागरमधून ८०० कोटींचे, ३ मार्च २०२२ ला तर थेट अहमदाबाद विमानतळावरून साठ कोटींचे तर २१ एप्रिल २०२२ का कांडला बंदरातून २५० कोटींचे अमली पदार्थ पकडण्यात आले. यावरून गुजरातमार्ग किती मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी होत आहे हे दिसून येते.

वेळोवेळी आपले सुरक्षा दल सतर्क असल्याने ही कारवाई होत असली तरी यातून या तस्करीला आपण पूर्णपणे रोखू शकलेलो नाही, हेच स्पष्ट होते आणि तोच भारतासाठी चिंतेचा विषय आहे. वेळोवेळी झालेल्या कारवाईतून अनेक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तस्कर अमली पदार्थ खुलेआम न पाठविता वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरतात.

कधी दोऱ्यांच्या बंडलमधून तर कधी पुस्तकातून तर कधी चक्क टाल्कम पावडरच्या नावाने ड्रग्ज पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे. यात एक कारवाईत पकडण्यात आलेला कंटेनर हा विजयवाडा येथील आयातनिर्यात करणाऱ्या एजन्सीमार्फत आला होता. आणि त्या एजन्सीने चक्क अफगाणिस्तानातून टाल्कम पावडरच्या नावाने हे ड्रग्ज मागविले होते.

आंध्रातील एजन्सी पश्चिमकेडील इतर बंदरातून कंटनेर मागविण्याऐवजी गुजरातमधील कांडला बंदर का पसंत करते यावरूनच संशयाला जागा निर्माण होते. या कारवाईआधी पकडण्यात अपयश आलेले किमान अडीचशे कोटींचे अमली पदार्थ गेले कुठे असा प्रश्न गुजरातमधील निवडणुकीच्या तोंडावर तेव्हाचा विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने उपस्थित करीत सरकारला धारेवर धरले होते.

मात्र त्यावर सरकारने काहीच खुलासा केला नाही, असा कॉँग्रेसचा आरोप राहिला आहे. आता प्रश्न उरतो तो आपली यंत्रणा सजग असली तरी यंत्रणेतील काही झारीचे शुक्राचार्य या तस्करांना मिळालेले नाहीत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. यंत्रणेतील अशाच फटींचा तस्कर फायदा घेत असून ते अमली पदार्थ देशभर पोचवीत आहेत.

काही दिवसांपूर्वी सीम सुरक्षा दलाच्या जवानांनी राजस्थानच्या सीमावर्ती भागात एक ड्रोन पकडला होता. त्याच्या चारही बाजूंनी अमली पदार्थाच्या पुड्या बांधण्यात आलेल्या होत्या. तस्कर सुरक्षा यंत्रणा भेदण्याचे नवनवीन प्रकार अमलात आणू शकतात हे लक्षात घेता आगामी काळात गुजरातच्या किनारपट्टीवर डोळ्यात तेल घालून लक्ष देणे गरजेचे आहे.

आयात कंटेनरची तपासणी का नाही?

भारताला लाभलेल्या समुद्रकिनारपट्टीपैकी गुजरातची किनारपट्टी सुमारे १६४ किलोमीटरची आहे. या किनारपट्टीवर १४४ छोटेमोठे बंदरे- द्वीप, २२ पोलिस ठाणे, तीन इंटरसेप्टिंग स्टेशन आहेत. यात कच्छची खाडी आणि सौराष्ट्रच्या प्रदेशात कमी प्रमाणात बंदरे असल्याने तेथे सुरक्षाव्यवस्थाही कमी असते. मुंबईवरील हल्ल्यासाठी पळविण्यात आलेली कुबेर बोट ही पोरबंदरवरूनच अपहरण करण्यात आली होती.

सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणा तेव्हापासून आजही कायम असावा म्हणून अमली पदार्थांची कंटेनर खुलेआम येत आहेत. पाकिस्तानला लागून असलेल्या कच्छच्या खाडीतून सर्वाधिक तस्करी होते, ती कमी सुरक्षेमुळेच. मोठ्या प्रमाणावरील साठा हा कंटनेरमधून अलीकडे अदानी बंदरातून पकडण्यात आला होता.

तेव्हा बंदर व्यवस्थापन फक्त मालाची ने-आण साठी आहे, कंटनेरमध्ये नेमके काय असते हे आम्ही तपासत नाही हे ‘अदानी शिपिंग’ने दिलेले उत्तरही आपल्याकडील आयात मालाच्या कंटेनरबाबतची उदासीनताच दर्शविते. एकुणात गुजरातमार्ग आणि गुजरातलगत होणारी अमली पदार्थांची तस्करी थांबविणे याला सरकारने आंतरराष्टीय सुरक्षेच्या दृष्टीने प्राधान्य देण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com