
काँग्रेसला आणखी एक धक्का
नवी दिल्ली / गांधीनगर : काँग्रेसला गुजरातमध्ये आणखी एक धक्का बसला आहे. आदिवासी नेते तसेच तीन वेळचे आमदार अश्विन कोतवाल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला. कोतवाल ५८ वर्षांचे आहेत. साबरकांठा जिल्ह्यातील खेडब्रह्मा मतदार संघाचे ते प्रतिनिधित्व करतात. अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. तेथून ते २००७, २०१२ आणि २०१७ अशा तीन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले.
कोतवाल यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ घटून ६३ झाले. १८२ सदस्यांच्या विधानसभेत भाजपची सदस्यसंख्या १११ वर गेली. हार्दिक पटेल यांनी नुकतीच काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर टीका केली. ते काँग्रेस सोडण्याची दाट शक्यता आहे.
मोदींची ऑफर अन् त्यांचा फॅन
कोतवाल म्हणाले की, २००७ मध्ये मी सर्वप्रथम आमदार म्हणून निवडून आलो तेव्हा मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते. आदिवासींच्या उद्धारासाठी तुमच्यासारख्या निष्ठावान लोकांची गरज असल्याचे सांगून त्यांनी भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते. मी ते स्वीकारले नाही, पण तेव्हापासूनच मी मोदीजींचा चाहता बनलो. त्यांच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये आदिवासी भागांचा विकास झाल्याचा माझा ठाम विश्वास आहे.
जनतेत लोकप्रिय असलेल्या नेत्यांना काँग्रेस तिकीट देत नाही. पक्षश्रेष्ठींच्या मर्जीतील नेत्यांना झुकते माप मिळते. भविष्यात मलाही तिकीट नाकारले जाण्याची भीती वाटते. तेथे असा अन्याय होत असल्यामुळेच मी भाजपमध्ये दाखल झालो.
- अश्विन कोतवाल, गुजरातचे नेते
Web Title: Gujarat Congress Three Time Mla Kotwal In Bjp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..