रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांच्या भावाचा मृत्यू

वृत्तसंस्था
Wednesday, 9 October 2019

रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होऊ न शकल्यामुळे उपचाराअभावी एका रुग्णाला जीव गमवावा लागला आहे. मुख्यमंत्र्यांच्याच भावाला हा अनुभव आल्याने प्रशासनही हादरून गेले आहे.

राजकोट (गुजरात): गुजरातमध्ये रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होऊ न शकल्यामुळे उपचाराअभावी एका रुग्णाला जीव गमवावा लागला आहे. संबंधित रुग्ण हा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मावस भाऊ आहे.

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे मावस भाऊ अनिल संघवी यांना रुग्णालयात पोहचण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. यामुळे त्यांना जीव गमवावा लागला आहे, अशी तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे. रुग्णवाहिका वेळेत का उपलब्ध होऊ शकली नाही, याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

अनिल संघवी यांचे सौराष्ट्र कला केंद्र इश्वरिया येथे निवासस्थान आहे. 4 ऑक्टोबर रोजी त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्यांचा मुलगा गौरांग याने 108 नंबरला फोन करून रुग्णवाहिका बोलावण्याचा निर्णय घेतला. वारंवार फोन करूनही रुग्णवाहिका वेळेत येऊ शकली नाही. अखेर, 45 मिनिटानंतर रुग्णवाहिका आली. परंतु, तोपर्यंत त्यांची प्रकृती खालावत गेली. रुग्णवाहिका आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णाला वेळेत आणले असते तर जीव वाचला असता, असे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्याच नातेवाईकाला हा अनुभव आल्याने प्रशासनही हादरून गेले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gujrat 108 ambulance servis niligance cm vijay rupanis cousin dies in rajkot