'...तर काँग्रेसला पुढची 50 वर्षे विरोधी पक्षातच बसावं लागेल'; गुलाम नबी आझाद यांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

गुलाम नबी आझाद म्हणाले की,'पक्षाला भक्कम करणं हाच  पत्र लिहिण्यामागचा उद्देश होता.' सोमवारी झालेल्या पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत यामुळे मोठा वादही निर्माण झाला होता. 

नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरून गेल्या दोन आठवड्यामध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांपैकी एक असलेल्या गुलाम नबी आझाद यांनी पत्राबाबत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. गुलाम नबी आझाद म्हणाले की,'पक्षाला भक्कम करणं हाच  पत्र लिहिण्यामागचा उद्देश होता.' सोमवारी झालेल्या पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत यामुळे मोठा वादही निर्माण झाला होता. 

गुलाम नबी आझाद यांनी त्यांची बाजू मांडताना म्हटलं की, काँग्रेसला भक्कम करणं हाच उद्देश होता. मी गेल्या 34 वर्षांपासून कार्यकारी समितीमध्ये आहे. ज्यांना काहीच माहिती नाही आणि अपॉइंटमेंटचं कार्ड मिळालं आहे ते विरोध करत आहेत. ते सर्व बाहेर जातील. काँग्रेसला जर 50 वर्षांपर्यंत विरोधी पक्षातच बसायचं असेल तर कार्यकारी समितीत निवडणूक घेऊ नये. मला यामुळे काय फायदा मिळणार? असाही प्रश्न त्यांनी विचारला. म्हणजेच जर काँग्रेसनं कार्यकारी समितीची निवडणूक घेतली नाही तर काँग्रेसवर पुढची 50 वर्षे विरोधी पक्षात बसण्याची वेळ येईल असा अप्रत्यक्ष इशाराच गुलाम नबी आझाद यांनी दिला.

कोणताही काँग्रेस पक्षनेता ज्याला काँग्रेसमध्ये काम करायचं आहे तो आमच्या प्रस्तावाचे नक्कीच स्वागत करताना दिसला असता. मात्र काही लोक आमच्या प्रस्तावाला विरोध करताना दिसले. आम्ही एवढंच म्हटलं होतं की, प्रदेश, जिल्हा आणि विभाग स्तरावर अध्यक्षाची नियुक्तीसाठी निवडणूक व्हायला हवी. काँग्रेसच्या कार्यकारी समितीमध्येही असंच व्हायला हवं असंही गुलाम नबी आझाद म्हणाले. 

आझाद यांनी सांगितलं की, जे लोक कार्यकारी समितीच्या बैठकीवेळी बोलत होते ते ते नियमांचे उल्लंघन करत नव्हते? ज्या लोकांनी आम्हाला पत्र लिहिल्याच्या कारणाने दोष दिला, अपशब्द वापरले त्यांनी उल्लंघन केलं नाही का? त्यांच्याविरोधात कोणती कारवाई व्हायला हवी की नाही? आम्ही कोणासाठी अपशब्द नाही वापरले.

हे वाचा - नव्या शिक्षण धोरणाबाबत तज्ज्ञांच्या सूचना मागविल्या

पत्र लीक झालं तर त्यावरून वाद निर्माण करण्याची काय गरज? जे काही केलं ते पक्षाच्या हितासाठी केलं. पक्षासाठी आणि निवडणुकीबाबत यात गुपित काहीच नाही. इंदिरा गांधींच्या कार्यकाळातही मंत्रीमंडळातील गोष्टी बाहेर जायच्या. सुरुवातीला राहुल गांधींना पत्राची अडचण होती. नंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी एक महिन्यातच निवडणूक घ्यावी असं म्हटलं. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे शक्य नाही आणि यासाठीच आम्ही सोनिया गांधींना पुढच्या सहा महिन्यांसाठी हंगामी अध्यक्ष राहण्यासाठी विनंती केली असंही गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gulam nabi azad says congress will sit in opposition for next 50 years