‘ज्ञानव्यापी’चा वाद: अधिकाऱ्यांकडून बंदोबस्तात सर्वेक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gyanvapi survey updates varanasi kashi vishwanath temple kashi gyanvapi masjid dispute Videography
‘ज्ञानव्यापी’चा वाद: अधिकाऱ्यांकडून बंदोबस्तात सर्वेक्षण

‘ज्ञानव्यापी’चा वाद: अधिकाऱ्यांकडून बंदोबस्तात सर्वेक्षण

वाराणसी : न्यायालयाने हिरवा कंदील दर्शविल्यानंतर येथील ज्ञानव्यापी मशिदीच्या परिसरामध्ये शनिवारी कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये व्हिडिओग्राफी सर्व्हे करण्यात आला. ही सर्वेक्षणाची प्रक्रिया शांततेमध्ये पार पडली असून उद्या (ता.१५) देखील ती सुरू राहील अशी माहिती सूत्रांनी दिली. वाराणसीचे पोलिस आयुक्त सतीश गणेश यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, ‘‘ सर्वेक्षणाचे काम हे शांततेत पार पडले. या सगळ्या प्रक्रियेला कुणीही आक्षेप घेतला नाही. सगळ्याच पक्षकारांनी आम्हाला या कामामध्ये सहकार्य केले. आजच्या सर्वेक्षणाचे काम हे संपले असून उद्या (ता.१५) देखील ते सुरू राहील.’’

आजच्या सर्वेक्षणाच्या प्रक्रियेमध्ये सर्व पक्षकार, त्यांचे वकील, न्यायालयाचे कमिशनर आणि व्हिडिओग्राफर देखील सहभागी झाले होते. ज्ञानव्यापी मशीद ही प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराला लागूनच आहे. या मशिदीच्या वास्तूमध्ये आम्हाला दैनंदिन प्रार्थनेची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करत काही महिला भाविकांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी घेताना सत्र न्यायालयाने सर्वेक्षण सुरूच ठेवण्याचे निर्देश दिले होते. सत्र न्यायालयाच्या या आदेशांना मुस्लिम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील आव्हान दिले होते पण या न्यायालयानेही त्याला स्थगिती देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला होता.

मोठा फौजफाटा तैनात

या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली गंभीर स्थिती लक्षात घेता मशिदीच्या वास्तूभोवती दीड हजारांपेक्षाही अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. मशिदीपासून पाचशे मीटर अंतरावरील सगळे व्यवहार थांबविण्यात आले होते. वाहतूक ही रोखून धरण्यात आली होती. सर्वेक्षण करणारे पथक सकाळी साडेसातच्या सुमारासच चार क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ पोचले होते. या सर्वेक्षणासाठी विशेष लाईट आणि कॅमेऱ्याची देखील सोय करण्यात आली होती. स्थानिक न्यायालयाने आदेश दिल्यामुळे मशीद व्यवस्थापन समितीने देखील या कामी पूर्ण सहकार्य केले.

आतमध्ये बरेच काही आहे ः बिसेन

आज मशिदीच्या तळघरात असलेल्या चार खोल्या आणि पश्चिम दिशेला असलेल्या प्रवेशद्वाराचे सर्वेक्षण करण्यात आले. ही सर्वेक्षणाची प्रक्रिया तब्बल चार तास चालली. या सर्वेक्षणानंतर बाहेर आलेले वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्रसिंह बिसेन यांनी आतमध्ये आम्ही कल्पना केली त्यापेक्षा बरेच काही असल्याचे सांगितले. अनेक खोल्यांचे कुलूप तोडण्यात आले. आता उद्या (ता.१५) देखील बरेच काम होणे बाकी असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्वेक्षणाच्या अहवालातून सगळ्या बाबी जाहीर करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

पुढील आठवड्यामध्ये सुनावणी होणार

ज्ञानव्यापी मशिदीमधील सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या व्यवस्थापन समितीच्या याचिकेवर पुढील आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. अंजुमन इनतेजामिया मशीद व्यवस्थापन समितीने ही याचिका सादर केली आहे. न्या. डी.वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पीठासमोर या याचिकेवर सुनावणी होऊ शकते. या प्रस्तावित सुनावणीची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तत्पूर्वी सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता.

देशामध्ये मुस्लिम मतपेढी असा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही तसे असते तर बाबरी आणि ज्ञानव्यापीबाबत अशी वेळ आलीच नसती. याआधी आमच्यापासून बाबरी हिरावून घेण्यात आली पण आता ज्ञानव्यापी घेता येणार नाही.

-असदुद्दीन ओवेसी, खासदार, एमआयएम

Web Title: Gyanvapi Survey Updates Varanasi Kashi Vishwanath Temple Kashi Gyanvapi Masjid Dispute Videography

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top