Haiderpora encounter: निरपराध मुलाला चकमकीत मारले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Haiderpora encounter:  निरपराध मुलाला चकमकीत मारले
Haiderpora encounter: निरपराध मुलाला चकमकीत मारले

Haiderpora encounter: निरपराध मुलाला चकमकीत मारले

श्रीनगर : सुरक्षा दल आणि पोलिसांनी श्रीनगरमधील व्यापारी संकुलात सोमवारी रात्री केलेली दहशतवादविरोधी कारवाई वादग्रस्त ठरली आहे. यात मारला गेलेला मुलगा निरपराध होता असा दावा त्याच्या वडिलांनी केला आहे, तर तो हायब्रीड दहशतवादी होता असे पोलिसांनी ठामपणे सांगितले आहे.

या कारवाईत दोन व्यापारी आणि दोन दहशतवादी मारले गेल्याचे पोलिसांनी बुधवारी जाहीर केले होते. त्यातील एका दहशतवाद्याच्या वडिलांनी पोलिसांना लक्ष्य केले. अब्दुल लतीफ मग्राय असे या नागरिकाचे नाव आहे. २००५ मध्ये जम्मूच्या रामबन जिल्ह्यात त्याने एका दहशतवाद्याला दगडाचे ठेचून मारले होते. त्याचा २४ वर्षांचा मुलगा आमीर एका दुकानात कामगार होता. आपल्या मुलाचा मृतदेह ताब्यात देण्यासही पोलिसांनी नकार दिला असा आरोप अब्दुल यांनी केला. आपल्या घरासमोर अजूनही पोलिसांचा पहारा आहे. उद्या सुरक्षा दलाचे जवान मला मारून टाकतील आणि मी दहशतवादी असल्याचा आरोप करतील, अशी भीतीही अब्दुल यांनी व्यक्त केली.

मुलांना गुप्त ठिकाणी लपविले

अब्दुलने सांगितले की, एका दहशतवाद्याला यमसदनास धाडण्याची कामगिरी पार पाडल्याबद्दल लष्कराकडून मला २००५ मध्ये प्रशस्तीपत्रक देण्यात आले होते. मी स्वतः दहशतवाद्यांच्या गोळ्या झेलल्या आहेत. माझा चुलत भाऊ दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारला गेला. आम्हाला स्थलांतर करून ११ वर्षे घरापासून दूर राहावे लागले. मुलांना गुप्त ठिकाणी लपवून अनंत अडचणींचा सामना करीत मी त्यांना लहानाचे मोठे केले. दहशतवाद्याला मारलेल्या एका भारतीयाला त्याच्या त्यागाबद्दल मिळालेले फळ म्हणजे त्याच्या मुलावर दहशतवादी असल्याचा शिक्का मारून ठार करण्यात आले.

नायब राज्यपालांना विनंती

माग्राय यांनी न्याय मिळावा तसेच उचित दफनविधीसाठी मुलाचा मृतदेह मिळावा अशी विनंती जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना केली.

पुरावे देण्याचे आव्हान

मुलासाठी लढा कायम ठेवू असा निर्धार करीत मग्राय म्हणाले की, पोलिसांकडे काही पुरावे असतील तर ते द्यावेत.

रामबनमध्ये प्रतिबंधात्मक आदेश

बनीहाल (वृत्तसंस्था) : हैदरपोरा चकमकीत फामरोट येथील महंमद आमीर हा युवक मारला गेल्यामुळे रामबन जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे काही गावांत पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले. कुटुंबीयांना निषेधासाठी काहीही करता येऊ नये हा पोलिसांचा उद्देश आहे. पाकिस्तानच्या हैदर नावाच्या साथीदारासह आमीर मारला गेल्याचा पोलिसांचा दावा आहे.

मेहबूबा यांच्याकडून निषेध

पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी सुरक्षा दलाच्या कारवाईचा निषेध केला. पक्षाच्या गांधीनगर येथील मुख्यालयासमोर त्यांनी धरणे धरले. त्यानंतर पोलिसांच्या मोठ्या पथकाने निदर्शकांना मुख्य रस्त्यावरून पुढे जाण्यापासून रोखले. त्या म्हणाल्या की, सशस्त्र दले विशेष अधिकार कायदा (एएफएसपीए) लागू झाल्यापासून निरपराध नागरिकांना मारले जाण्यावरून कोणतेही उत्तरदायित्व राहिलेले नाही. मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली केले जावेत अशी मागणीही त्यांनी केली. पोलिसांनी डिजिटल पुरावे असल्याचा दावा केला आहे. असे होते तर मग पोलिसांनी अटक का केली नाही, रोज अनेकांना अटक केली जात आहे, असेही त्या म्हणाल्या.

"हैदरपोरा चकमकीत मारल्या गेलेल्या दोन नागरिकांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे देण्यात यावेत. याबाबत मी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी बोललो असून त्यांना हस्तक्षेपाची विनंती केली आहे. निरपराध नागरिकांना मारले जात असल्यामुळे निपक्षपाती चौकशी केली जावी या मागणीचा पुनरुच्चार केला."

- फारुख अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष

loading image
go to top