esakal | निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनाने निधन
sakal

बोलून बातमी शोधा

हरिद्वार येथील कुंभमेळा

निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनाने निधन

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

देहरादून : हरिद्वारच्या कुंभमेळ्यात मध्य प्रदेशहून आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अलिकडेच महामंडलेश्वर यांना कोरोनाचे संक्रमण झालं होतं. त्यानंतर त्यांना देहरादूनच्या कैलाश हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचं 13 एप्रिल रोजी निधन झाल्याचं वृत्त आहे. असं म्हटलं जातंय की महाकुंभ मेळ्यात एखाद्या संताचा झालेला हा पहिला मृत्यू आहे. हरिद्वारमध्ये कोरोना गाईडलाईन्सचं उल्लंघन होत आहे. त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. गेल्या 72 तासांमध्ये 1500 हून अधिक पॉझीटीव्ह केसेस फक्त हरिद्वारच्या कुंभमेळा परिसरातून समोर आले आहेत. तर यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या आता आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. कारण अजून मोठ्या संख्येने अनेकांचा कोरोना रिपोर्ट येणे बाकी आहे.

हेही वाचा: पुणे : रेमडेसिव्हिरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांचा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या

गेल्या वर्षी तबलिगी जमातच्या मरकजमुळे कोरोना पसरल्याचा आरोप करण्यात येत होता. त्याचप्रमाणे यंदा कुंभमेळ्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, या आरोपांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी सरळसरळ धुडकावून लावले होते. त्यांनी म्हटलं होतं की, कुंभमेळा आणि मरकज यांनी तुलना करू नये. कुंभमेळा एका विस्तीर्ण अशा मोकळ्या जागेत होत आहे. पण मरकज हे एका बंद इमारतीत झालं होतं, असं रावत म्हणाले होते. एकप्रकारे त्यांनी कुंभमेळ्याच्या आयोजनाबाबत ना हरकत प्रमाणपत्रच या वक्तव्यातून दिलं होतं. मात्र, आता हाच गाफीलपणा आणि अतिआत्मविश्वास नडताना दिसून येत आहे.

हेही वाचा: पुणे मार्केट यार्डात मिळणार दहा रुपयात जेवण; ओसवाल बंधू समाज आणि चेंबरचा उपक्रम

कुंभमेळ्याचा कालावधी कमी करण्यास नकार कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या दरम्यानच उत्तराखंड सरकारने हरिद्वारच्या कुंभ मेळ्याचा कालावधी कमी करण्यास नकार दिला आहे. सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या वक्तव्यात म्हटलं गेलंय की, मेळ्याचा कालावधी कमी करण्याचा कसलाही विचार नाहीये. तसेच असा कोणताही प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठवला नाहीये. कुंभ 30 एप्रिलला आपल्या निर्धारित वेळेलाच समाप्त होईल. हरिद्वारमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे. तिसऱ्या शाही स्नानाच्या दरम्यान देखील कोरोनाच्या नियमांचं मोठ्या प्रमाणावर दिवसाढवळ्या उल्लंघन झाल्याचं पाहण्यात आलं. अधिकतर लोक विनामास्कच होते. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा कसलाही मागमूस याठिकाणी नव्हता. त्यामुळेच आता हरिद्वारमध्ये कोरोनाचा विस्फोट झालेला पहायला मिळत आहे.

loading image
go to top