डॉक्टर 'एमआरआय' मशीनमध्येच विसरले रुग्णाला...

वृत्तसंस्था
Tuesday, 24 September 2019

एका रुग्णालयाचे कर्मचारी रुग्णाला चक्क 'एमआरआय' मशीनमध्येच विसरले. तब्बल अर्धातास ते मशिनमध्ये अडकले होते.

पंचकुला (हरियाणा): एका रुग्णालयाचे कर्मचारी रुग्णाला चक्क 'एमआरआय' मशीनमध्येच विसरले. तब्बल अर्धातास ते मशिनमध्ये अडकले होते. श्वास कोंडला जात असताना त्यांनीच स्वतःची सुटका केली. यामुळे त्यांचा जीव वाचला आहे.

रामहर लोहान (वय 59) असे जीव वाचलेल्या रुग्णाचे नाव आहे. लोहान यांना दुचाकीवर अपघात झाला होता. यामुळे त्यांचा खांदा दुखत होता. डॉक्टरांनी त्यांना एमआरआय करण्यास सांगितले. यामुळे लोहान हे सेक्टर सहामधील रूग्णालयात एमआरआय चाचणी करण्यासाठी गेले होते. डॉक्टर व तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना एमआरआय मशीनमध्ये ठेवले. मात्र, लोहान यांना बाहेर काढण्यास ते विसरले. लोहान यांचा श्वास कोंडू लागला. परंतु, त्यांना पट्याने बांधले असल्यामुळे उठता येत नव्हते. श्वास कोंडू लागल्यामुळे त्यांनी जोरजोरात धडपड सुरू केली. धडपडीमुळे मशीनचा पट्टा तुटला व तब्बल अर्धा तासानंतर ते बाहेर आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना लोहान म्हणाले, 'डॉ. ललित कौशल व त्यांच्या कर्मचाऱयांनी मला एमआरआय करण्यासाठी मशिनमध्ये ठेवले. 10 ते 15 मिनिटानंतर बाहेर काढणे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी मला बाहेर काढलेच नाही. अर्धा तास मशिनमध्ये मी तडफडत होतो. मोठ-मोठ्याने रडत-ओरडत होतो. परंतु, कोणीच आले नाही. अखेर पट्टा तुटला आणि माझा जीव वाचला. याबाबत मी हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांच्याकडे तक्रार केली आहे.'

रुग्णालयाचे डॉ. योगेश शर्मा म्हणाले, 'लोहान यांच्याबाबत सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सीसीटीव्हीमध्ये लोहान हे एमआरआय मशिनमधून बाहेर येताना दिसत आहेत.'

रुग्णालयाचे राजीव मिगलानी म्हणाले, 'लोहान यांना 20 मिनिटांसाठी मशीनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यापैकी शेवटच्या तीन मिनिटांमध्ये कर्मचारी सर्व आकड्यांची नोंदणी करणार होते. मात्र, दोन मिनीट बाकी असतानाच या व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागले. मशीनमधील आकडे घेण्यासाठी गेलेला कर्मचारी परत आला तेव्हा लोहान हे स्वत:च धडपडत मशीनच्या बाहेर येताना त्याला दिसले. त्याने लगेच बाहेर काढण्यास मदत केली.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haryana man stuck in MRI machine as doctors allegedly forgot he was inside