Hathras Case:पोलिसांच्या एफआयआरमध्येही राजकारण?; कुटुंबाला 50 लाखांची ऑफर दिल्याचा उल्लेख

टीम ई-सकाळ
Tuesday, 6 October 2020

पीडित तरुणीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी विरोधीपक्षाचे नेते आणि मीडियाला विरोध करण्यात आला होता. पोलिसांनी गावाबाहेर मीडियाला रोखून धरले होते. मीडिया आणि पोलिस यांच्यातील संघर्ष देशभरात चर्चेचा विषय ठरला होता.

हाथरस (Uttar Pradesh): हाथरस सामूहिक बलात्कारप्रकरणाला राजकीय वळण यापूर्वीच लागलंय. पण, आता थेट पोलिसांच्या एफआयआरमध्येही राजकारण दिसू लागलंय. हाथरसच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल करून घेतलेल्या 19 वेगवेगळ्या एफआयआरमध्ये, पीडितेच्या कुटुंबियांना 50 लाख ऑफर केल्याचा उल्लेखही करण्यात आलाय. थेट एफआयआरमध्ये असा उल्लेख करण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत एनडीटीव्हीने बातमी प्रसिद्ध केली आहे. 

दंगल पेटवण्याचा कट?
एनडीटीव्हीने प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटले आहे की, हाथरस गावात या संदर्भात सहा एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एका एफआयआरमध्ये पीडित तरुणीच्या कुटुंबाला राज्य सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी 50 लाख रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आलाय. त्या संदर्भातील डिटेल्स अद्याप मिळालेले नाहीत. स्थानिक पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाने ही एफआयआर दाखल केली असून, त्यात राज्यात जातीय दंगल पेटवण्याचा कट असल्याचेही म्हटले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पत्रकारांवर आरोप?
पीडित तरुणीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी विरोधीपक्षाचे नेते आणि मीडियाला विरोध करण्यात आला होता. पोलिसांनी गावाबाहेर मीडियाला रोखून धरले होते. मीडिया आणि पोलिस यांच्यातील संघर्ष देशभरात चर्चेचा विषय ठरला होता. परंतु, मीडियाच्या प्रतिनिधींनी पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आता मीडिया प्रतिनिधींच्या प्रश्नांचा आधार घेऊन, पोलिस एफआयआरमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. एका पत्रकाराने संबंधित तरुणीच्या भावाचा व्हिडिओ बाईट घेताना, 'आपण राज्य सरकारवर नाखूष आहे,' असे वक्तव्य करण्यासाठी दबाव टाकल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर चुकीची वक्तव्ये शेअर करण्यामागे त्यांची बदनामी करण्याचा मोठा कट असल्याचेही पोलिस एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. हाथरसची घटना एका मोठ्या कटाचा भाग असल्याचं वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रशांत कुमार यांनी सोमवारी म्हटलं होतं. तसचं याचा पोलिस निश्चित योग्य तपास करतील, असंही ते म्हणाले होते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय घडले होते?
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका 20 वर्षीय दलित तरुणीवर उच्च जातीतील चौघा जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. तिला मारहाण करून, जखमी अवस्थेत सोडून दिले होते. तिची जीभ कापण्यात आली होती. पोलिसांनी तिची बलात्काराची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. संबंधित तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचे तिच्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hathras case 50 lakhs offered to family says up police fir