हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवणार- योगी आदित्यनाथ

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 3 October 2020

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका 19 वर्षीय दलित मुलीवर झालेला कथीत बलात्कार आणि क्रूर अत्याचाराप्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका 19 वर्षीय दलित मुलीवर झालेला कथीत बलात्कार आणि क्रूर अत्याचाराप्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 

 

लाईव्ह अपडेट-

-उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस प्रकरणी सीबीआय Central Bureau of Investigation (CBI) चौकशीची शिफारस केली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 

-पीडितेच्या कुटुंबियांशी भेटल्यानंतर राहुल आणि प्रियांका गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. अन्यायाविरोधात वारंवार आवाज उठवणार असल्याचं प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरुच असेल, असंही त्या म्हणाल्या. 

-काँग्रेस पीडितेच्या कुटुंबियांसोबत असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत. 

- कुटुंबियांना तिला शेवटचंही पाहू दिलं गेलं नाही. योगी आदित्यनाथ यांनी याची जबाबदारी घ्यायला हवी- प्रियांका गांधी 

-निर्भयाची केस लडणाऱ्या अधिवक्ता सीमा कुशवाह आता हाथरस पीडितेचीही केस लढणार आहेत. त्यांनी माध्यमांसमोर ही माहिती दिली आहे. 

- पीडितेच्या कुटुंबीयांशी चर्चा करताना प्रियांका गांधी भावुक झाल्याचे पाहायला मिळाल्या. पीडितेच्या आई-वडिलांची व्यथा ऐकून प्रियांका यांना अश्रू अनावर झाले होते.

-राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आहे. त्यांनी पीडितेचे आई-वडिल आणि भावाशी चर्चा केली. कुटुबांने जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

-न्याय मिळेपर्यंत अस्थींचे विसर्जन करणार नाही, असं मोठं वक्तव्य पीडितेच्या कुटुंबियांकडून करण्यात आलं आहे.

-पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे.

- विरोधकांना हाथरसला जाण्याची सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, केवळ पाच जणांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटता येणार आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी कुटुंबीयांना भेटणार आहेत. 

- यमुना एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी मानवी साखळी तयार केली आहे. तसेच काँग्रेस कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात याठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

-प्रियांका गांधी स्वत: गाडी चालवत हाथरसकडे निघाल्या आहेत. त्यांच्या सोबत खासदार राहुल गांधी हेही आहेत. 

- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि  महासचिव प्रियांका गांधी पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी रवाना. त्यांच्यासोबत काँग्रेसचे 20 पेक्षा अधिक खासदारही आहेत. 

-यमुना एक्सप्रेस वेवर उत्तर प्रदेश पोलिसांचा मोठा फौजफाटा

-उत्तर प्रदेशचे  पोलिस महासंचालक एचसी अवस्थी यांनी आज सकाळी पीडितीच्या कुटुंबियांची भेट घेतली.

- 200 पेक्षा अधिक पोलिस एक्सप्रेस वेवर उभे आहेत. त्यांच्याकडे लाठ्या-काठ्या देण्यात आल्या आहेत. 

-प्रियांका गांधी यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, कोणतीही शक्ती मला हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रोखू शकत नाही. यावेळी आम्हाला भेटू दिलं नाही, तर पुन्हा आम्ही प्रयत्न करु. 

-राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटू न देण्याचे निर्देश मिळाले असल्याचे अधिकारी प्रेम प्रकाश मीना यांनी एएनआयला सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांना एक्सप्रेस वेवरच अडवले जाणार असल्याचं सांगण्यात आले आहे. रस्त्यावर बॅरिकेड लावण्यात आले आहेत. 

-हाथरसमध्ये माध्यमांना पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्याची परवानगी दिली आहे. मात्र हाथरसमध्ये राजकीय व्यक्तींना पीडित कुटुंबियांची भेट घेण्याची परवानगी नसल्याचं हाथरसच्या एसडीएमनी सांगितलं आहे. योगी सरकारने हाथरस प्रकरणी पोलिस अधीक्षकासह चार कर्मचाऱ्यांवर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई केली आहे. पोलिसांनी पीडितेच्या मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार केल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hathras case live update rahul gandhi will meet victim family