hathras case: वडिलांना मारहाण, मोबाईलही घेतले; पीडितेच्या भावाची धक्कादायक माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 2 October 2020

हाथरस प्रकरणावरुन वातावरण चांगलेच तापले आहे.

नवी दिल्ली- हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना ओलीस ठेवण्यात आले आहे. त्यांना कोणाशीही बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच त्यांचे फोन स्विच ऑफ करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पीडितेच्या भावाने दिली आहे. यासंदर्भातील वृत्त 'एबीपी न्यूज' या वृत्तसंस्थेने दिले आहे. 200 पोलिसांनी घराला घेराव घातला आहे. त्यांनी वडिलांना मारहाणही केली आहे. तसेच माध्यमांशी न बोलण्यास सांगितले आहे. घरातील सर्वजण घाबरले आहेत. मी कसेतरी शेतातून लपून येथे आलो आहे, अशी माहिती पीडितेच्या भावाने माध्यमांशी बोलताना दिली. 

हाथरस प्रकरणावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना रस्त्यातच अडवण्यात येत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गुरुवारी पीडित कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना ताब्यात घेण्यात आले. शिवाय राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. राहुल आणि प्रियांका यांच्या विरोधात महामारी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माध्यमांनाही पीडितेच्या कुटुंबीयांशी भेटण्यास मज्जाव करण्यात येत आहे. पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा याठिकाणी तैनात केला आहे. रस्त्यावर बॅरिकेडिंग लावण्यात आली आहे. 

कृषी कायद्याविरोधात आंदोलन,माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांना अटक

योगी सरकारच्या आदेशानंतर पोलिसांनी हाथरसला जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. माध्यमांनाही त्या ठिकाणी जाण्यापासून रोखले आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही मनाई करण्यात आली आहे. गावात कोणालाच प्रवेश दिला जात नाही. हाथरस पोलिसांनी प्रसारमाध्यमे, राजकीय प्रतिनिधी आणि इतर लोकांना गुरुवारपासूनच गावात प्रवेशबंदी केली आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे एक प्रतिनिधीमंडळ हाथरस जिल्ह्याच्या सीमेवर रोखण्यात आले. ते पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होते.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केलं. उत्तर प्रदेशातील आई-बहिणींच्या सन्मान आणि स्वाभिमानाला धक्का लावू पाहणाऱ्यांचा समुळ नाश केला जाईल. त्यांना अशी कठोर शिक्षा दिली जाईल, जे भविष्यात उदाहरण बनेल. उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक महिलेच्या सुरक्षा आणि विकासाच्या हेतूसाठी संकल्पबद्ध आहे आणि आमचं हे वचन आहे, असं योगी म्हणाले आहेत.  

(edited by- kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hathras case victim brother said police threatened family