esakal | Hathras Case: हाथरसमध्ये दिवसभरात काय घडलं? पोलिसांच्या दडपशाहीवर देशभरातून टीका
sakal

बोलून बातमी शोधा

hathras_0.jpg

उत्तरप्रदेशात दलित तरुणीवरील अत्याचार आणि खूनप्रकरणानंतर देशभर मोठा जनक्षोभ उसळला असताना पोलिसांनी पीडितेच्या गावाभोवती बंदोबस्ताचा फास आणखी आवळला आहे

Hathras Case: हाथरसमध्ये दिवसभरात काय घडलं? पोलिसांच्या दडपशाहीवर देशभरातून टीका

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

लखनौ : उत्तरप्रदेशात दलित तरुणीवरील अत्याचार आणि खूनप्रकरणानंतर देशभर मोठा जनक्षोभ उसळला असताना पोलिसांनी पीडितेच्या गावाभोवती बंदोबस्ताचा फास आणखी आवळला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊ पाहणारे विरोधी पक्षांचे नेते आणि माध्यमे या दोघांनाही दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी त्यांना नजरकैद केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणावर भाष्य करताना गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे. 


प्रार्थना सभेला प्रियंका गांधी उपस्थित

या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीसह देशभर आंदोलने करण्यात आली. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी वाल्मीकी मंदिरातील प्रार्थना सभेला उपस्थिती लावली. अन्यायाविरोधातील लढाई आणखी तीव्र करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, पीडितेच्या गावाला भेट देण्यासाठी निघालेले तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला पोलिसांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीमध्ये ओब्रायन जमिनीवर कोसळले. यावेळी त्यांच्यासोबत तृणमूलच्या दोन विद्यमान महिला खासदार आणि एका माजी खासदार देखील होता. माध्यमांशी बोलताना माजी खासदार ममता ठाकूर म्हणाल्या की, ‘‘ महिला पोलिसांनी आमचे ब्लाऊज धरून खेचण्याचा प्रयत्न केला, आमच्या नेत्या प्रतिमा मोंडल यांना मारहाण तसेच धक्काबुक्की केली. यावेळी महिला पोलिस असताना देखील पुरुष पोलिसांनी मोंडल यांना स्पर्श केला. ही लाजीरवाणी बाब आहे.’’ स्थानिक प्रशासनाने मात्र नेहमीप्रमाणे तृणमूलच्या नेत्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. या झटापटीचा ३५ मिनिटांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून पांढरा शर्ट आणि हेल्मेट घातलेली व्यक्ती मोंडल यांना धक्काबुक्की करत असल्याचे त्यात स्पष्टपणे दिसत आहे. 

राहुल गांधी कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरणार; काढणार ट्रॅक्टर रॅली

दिवसभरात काय घडले?

-पीडितेच्या कुटुंबीयांकडून सीबीआय चौकशीची मागणी 
-हाथरस जिल्ह्यामध्ये कलम-१४४ लागू, सर्वत्र नाकाबंदी 
-गाझियाबादमध्ये पोलिसांविरोधात वकिलांचे आंदोलन 
-दिल्लीतील वाल्मीकी मंदिरात प्रियांका गांधींची प्रार्थना 
-चंडिगडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांवर पाण्याचे फवारे 
-महिला आयोगाकडून पोलिसांवर कारवाईची मागणी 
-लखनौमध्ये समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन 

बलरामपूर पीडितेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत 

बलरामपूरमधील पीडितेच्या कुटुंबीयांना उत्तरप्रदेश सरकारने आज मदत जाहीर केली. पीडितेच्या कुटुंबीयांना निवासी भूखंडाबरोबरच कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय रोख मदत म्हणून दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देखील देण्यात येईल. 

ट्रम्प कोरोनाबाधित झाल्याने जगभरातील शेअर मार्केटमध्ये खळबळ; कच्च्या तेलातही...

तोपर्यंत परवानगी नाही 

हाथरसमधील पोलिसांच्या दडपशाहीवर देशभरातून टीका होत असताना स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेमध्ये मात्र कसलाही बदल झालेला दिसत नाही. नेत्यांप्रमाणेच माध्यमांना देखील पीडितेच्या नातेवाइकांना भेटण्यास मज्जाव केला जात आहे. पोलिसांनी आमचे मोबाईल जप्त केले असून आम्हाला माध्यमांशी देखील बोलू दिले जात नाही, असे गावातील एका तरुणाने सांगितले. राज्य सरकारने मात्र या प्रकरणाची एसआयटी चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कुणालाही भेटण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. 

राहुल, प्रियांकांविरोधात एफआयआर 

कोरोना संसर्गाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याचा ठपका ठेवत यूपी पोलिसांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह दोनशे कार्यकर्त्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. साथरोग कायद्याअंतर्गत त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही कार्यकर्त्यांविरोधात महिला पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

'होम ऑन व्हिल्स' गंमतच न्यारी; कोरोनाकाळात ‘बेस्ट ऑप्शन’

उच्च न्यायालयाचे अधिकाऱ्यांना समन्स 

हाथरसमधील घटनेची अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने आज गंभीर दखल घेताना राज्य सरकारलाच धारेवर धरले आहे. न्यायालयाने याप्रकरणी सर्वच ज्येष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावले असून त्यांना १२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्या. रंजन रॉय आणि न्या. जसप्रित सिंग म्हणाले की, ‘‘आम्हाला या प्रकरणाची माहिती मिळविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रीत माध्यमांतून येणाऱ्या बातम्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.’’ 

राजधानीतही आंदोलन 
हाथरस घटनेचे पडसाद आज दिवसभर देशभरात उमटत होते. दिल्लीतही जंतर-मंतर येथे निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालदेखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी उपस्थित संतप्त आंदोलकांसमोर भाषण केले. दोषींना फासावर लटकावले पाहिजे, असं मत केजरीवाल यांनी व्यक्त केलं.