Hathras: तुमची मुलगी असती तर असेच अंत्यसंस्कार केले असते का, हायकोर्टाचा पोलिसांना सवाल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

आमच्या संमतीशिवाय मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. पोलिसांनी कोणावर अंत्यसंस्कार केले आहेत, हेही माहीत नसल्याचे पीडित कुटुंबीयांनी म्हटले.

लखनऊ- हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयाने उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान आपली बाजू मांडताना त्यांच्या संमतीशिवाय मुलीवर अंत्यसंस्कार केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी कोणावर अंत्यसंस्कार केले आहेत, हेही माहीत नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, पीडित कुटुंबीय रात्री उशिरा लखनऊतून गावी परतले. 

हाथरस घटनेची स्वतः दखल घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने सोमवारी उत्तर प्रदेश सरकारला फटकारले. त्याचवेळी पीडित मुलीवरील अंत्यसंस्कारावरुन न्यायालयाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. जर तुमची मुलगी असती तर तिचा चेहरा न पाहता तुम्ही अंत्यसंस्कार करु दिले असता का असा सवाल न्यायालयाने अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांना विचारला. 

न्यायालयाने हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीणकुमार यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना सुनावले. त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. पीडित कुटुंबीयांच्या वकील सीमा कुशवाहा यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले. अंत्यसंस्कार करताना गंगाजलचा उपयोग केला जातो. तुम्ही त्यात रॉकेल आणि पेट्रोलचा वापर केला. हे मानवाधिकाराचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले. 

हेही वाचा- सणासुदीसाठी कर्मचारी,राज्यांना ‘गिफ्ट; प्रवास भत्त्याची रक्कम मिळणार

पीडित कुटुंबीयाच्या तीन मागण्या

सुनावणी दरम्यान पीडित कुटुंबाने उच्च न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना तीन मागण्या ठेवल्या. हे प्रकरण उत्तर प्रदेशबाहेरील इतर कोणत्याही राज्यात हस्तांतरीत करावे, सीबीआय चौकशीचा अहवाल तपास पूर्ण होईपर्यंत गोपनीय ठेवावा त्याचबरोबर तपासाचा कालावधी निश्चित केला जावा, अशा तीन मागण्या त्यांनी केल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hathras If you had a daughter would you have done the same funeral the High Court asked the police