esakal | हाथरसमध्ये पोलिसांची दडपशाही, माध्यमांनाही रोखलं
sakal

बोलून बातमी शोधा

हाथरसमध्ये पोलिसांची दडपशाही, माध्यमांनाही रोखलं

सामूहिक अत्याचाराची बळी ठरलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांचे मोबाइल बंद करण्यात आले असून त्यांना इतर कोणाशीही बोलण्यास मज्जाव करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

हाथरसमध्ये पोलिसांची दडपशाही, माध्यमांनाही रोखलं

sakal_logo
By
वृत्तसंस्था

हाथरस (उत्तर प्रदेश): हाथरस येथील घटनेनंतर उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. पोलिसांनी पीडित मुलीच्या गावाला वेढा घातला असून आत जाण्यापासून रोखले आहे. 

प्रसारमाध्यमे आणि नेत्यांचाही प्रवेश रोखला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर पोलिसांचा वाद झाला आहे. पोलिस गैरवर्तन करत असल्याचा आरोप काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी  केला आहे. दरम्यान,  सामूहिक अत्याचाराची बळी ठरलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांचे मोबाइल बंद करण्यात आले असून त्यांना इतर कोणाशीही बोलण्यास मज्जाव करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

योगी सरकारच्या आदेशानंतर पोलिसांनी हाथरसला जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. माध्यमांनाही त्या ठिकाणी जाण्यापासून रोखले आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही मनाई करण्यात आली आहे. गावात कोणालाच  प्रवेश दिला जात नाही. हाथरस पोलिसांनी प्रसारमाध्यमे, राजकीय प्रतिनिधी आणि इतर लोकांना गुरुवारपासूनच गावात प्रवेशबंदी केली आहे. 

गावाच्या चारही बाजूला पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावातून कोणालाही बाहेर सोडले जात नाही आणि कोणाला प्रवेशही दिला जात नाहीये. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना गावापासून सुमारे  दीड किमी दूर रोखण्यात आले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खासदार डेरेक ओ ब्रायन यांनाही रोखले 
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे एक प्रतिनिधीमंडळ हाथरस जिल्ह्याच्या सीमेवर रोखण्यात आले. ते पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होते. याचदरम्यान  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हाथरस येथील घटना अत्यंत दुर्देवी असल्याचे म्हटले. पीडित कुटुंबीयांबरोबर राज्य सरकार चुकीचे वर्तन करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हाधिकाऱ्यांचा धमकीचा व्हिडिओ व्हायरल 
उत्तर प्रदेश सरकार आणि हाथरसचे जिल्हाधिकारी एका व्हिडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. जिल्हाधिकारी प्रवीणकुमार हे पीडित मुलीच्या घरी गेले होते.  हा व्हिडिओ गुरुवारचा असल्याचे सांगितले जाते.  यात जिल्हाधिकारी प्रवीणकुमार हे पीडितेच्या वडिलांना धमकावताना दिसत आहेत. 'तुमची विश्वसनीयता कायम ठेवा. मीडियाचे काय, आज ते येथे आहेत, उद्या येथे नसतीलही. ते सर्वजण निघून जातील. तुम्ही सरकारचे  म्हणणे ऐका. तुमची काय इच्छा आहे. आम्हीही उद्या बदलू शकतो.'