काँग्रेसला उत्तर प्रदेशात जातीय दंगली घडवायचीय; योगींचा गंभीर आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 4 October 2020

ज्यांना विकास नको आहे, ते जातीय दंगली घडवू इच्छित आहेत, असा आरोप उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज केला.

लखनौ- ज्यांना विकास नको आहे, ते जातीय दंगली घडवू इच्छित आहेत, असा आरोप उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज केला.
‘‘ज्यांना विकास आवडत नाही ते लोक देशात व प्रदेशात जातीय दंगली घडवू इच्छित आहेत. या दंगलीच्या आड विकास थांबेल व त्यांना त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्याची संधी मिळेल. यासाठीच नवनवीन षडयंत्र रचली जात आहेत. मात्र आम्हाला ही सर्व षडयंत्र ओळखून विकासाची प्रक्रिया पुढे न्यायची आहे. असे आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

जगभरात 'इस्लाम' धोक्यात; फ्रान्स अध्यक्षांच्या वक्तव्यानंतर मुस्लिम...

लोकदलाच्या नेत्यावर लाठीमार

सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांसह विविध संघटनांचे पदाधिकारी करत आहेत. मात्र, उत्तर प्रदेश सरकार भेट घेण्यास मज्जाव करत असल्याचे चित्र आहे. रविवारी राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना चौधरी यांच्यावर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे घटनास्थळी मोठी धावपळ झाली.

जयंत चौधरी यांच्यावर केलेला लाठीमार निंदनीय आहे. विरोधी नेत्यांविरुद्ध अशा प्रकारची कारवाई हे यूपी सरकारच्या अहंकाराचे सूचक आहे. आपला लोकशाही देश आहे. जनताच त्यांना याची आठवण करून देईल, असं काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत.

त्यांना ‘वाय’ सुरक्षा द्या

सामूहिक बलात्कार झालेल्या हाथरसमधील मुलीच्या कुटुंबीयांनी वाय सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केली आहे. त्यांनी रविवारी त्या परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणीही त्यांनी केली.

सात महिन्यानंतर पुन्हा सुरु होणार मक्का; 'उम्राह' यात्रेसाठी मशीद खुली

सीबीआय चौकशीला विरोध

हाथरसमधील बलात्काराच्या घटनेची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी सुरू करण्यात आली आहे. एसआयटी पथकातील वरिष्ठ अधिकारी भगवान स्वरूप यांनी रविवारी संबंधित मुलीच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवून घेतले. सीबीआयने अद्याप कागदपत्रे मागितली नसल्याने एसआयटी तपास सुरू आहे. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीला विरोध केला असून न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hatras case uttar pradesh yogi aadityanath criticize opposition