कृत्रिम हृदयाची10 वर्षे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

गेल्या 10 वर्षांपासून कोलकाता येथे राहणारे संतोष डुगर कृत्रिम हृदयासह सामान्य आयुष्य जगत आहेत.

कोलकाता : गेल्या 10 वर्षांपासून कोलकाता येथे राहणारे संतोष डुगर कृत्रिम हृदयासह सामान्य आयुष्य जगत आहेत. कृत्रिम हृदयासह एवढी वर्षे आयुष्य जगणाऱ्यांमध्ये भारतात निवडक व्यक्तींपैकी संतोष एक आहेत. संतोष यांच्या शरीरात 2009 मध्ये कृत्रिम हृदय लावण्यात आले होते. सन 2000 मध्ये त्यांना माहीत झाले होते, की आपला हृदय रोग शेवटच्या टप्प्यात आहे. त्यानंतर वारंवार येणाऱ्या हार्ट अटॅकमुळे संतोष डुगर (63) यांनी डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार लोप्ट वेट्रिक्‍युलर असिस्ट डिव्हाइस लावावे लागले.

त्या आधी त्यांनी स्टेम सेल थेरपी केली होती; मात्र ती यशस्वी झाली नाही. संतोष डुगर भारतातील 120 अशा रुग्णांपैकी एक आहेत, जे या डिव्हाईसचा वापर करत आहेत. हे मशीन हृदयाप्रमाणेच काम करते आणि ज्यांना हृदय ट्रान्सप्लांटची गरज आहे अशा रुग्णांना ते लावण्यात येते. 

संतोष डुगर सांगतात, की खरे तर सगळ्यात चांगला मार्ग हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी हा होता; मात्र त्या काळी मला हृदयदान करणारा व्यक्ती कधी मिळेल हेदेखील निश्‍चित नव्हते. संतोष यांना 2000 मध्ये पहिला हार्ट अटॅक आला होता. त्यांनी एंजियोप्लास्टी केली होती. मात्र, त्यानंतरही हृदय काम व्यवस्थित करेनासे झाले. त्यानंतर त्यांनी एम्समध्ये स्टेम सेल थेरपीदेखील केली; मात्र तीदेखील जास्त काळ चालली नाही. त्यानंतर हृदयरोगतज्ज्ञ पी. के. हजारा यांनी कृत्रिम हृदय लावण्याचा सल्ला दिला. या मशिनचे नाव हार्ट मेट 2 असे आहे. जे कमजोर हृदयात रक्ताचे पम्पिंग करण्याचे काम करते. याला रुग्णाच्या हृदयाजवळच इम्लांट केले जाते. 

डॉ. हजारा सांगतात, की बेंबीतून एक पॉवर केबल काढली जाते; जी बॅगेमधील कंट्रोलर आणि बॅटरीला जोडलेली असते. रुग्णाला ही बॅटरी वेळोवेळी चार्ज करावी लागते. जेव्हा संतोषसाठी हे मशीन अमेरिकेतून मागवले होते, तेव्हा याची किंमत तब्बल एक कोटी रुपयांच्या आसपास होती. मात्र, आता नवीन मशिनच्या किमती जवळपास 54 लाखांच्या आसपास आहेत. दरम्यान, संतोष या मशिनला धन्यवाद देतात; कारण त्यामुळे आज ते सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He has been living normal life for 10 years with an artificial heart

टॅग्स