esakal | केंद्र सरकारची नवीन आरोग्य दिशानिर्देश

बोलून बातमी शोधा

केंद्र  सरकारची नवीन आरोग्य दिशानिर्देश
केंद्र सरकारची नवीन आरोग्य दिशानिर्देश
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आणि इतर समन्वयाचे काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणांनी नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. रुग्णांची तीन गटात वर्गवारी करण्यात आली असून सौम्य लक्षणे असणाऱ्यांनी रुग्णालयात धाव न घेता गृह विलगीकरणातच राहून काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

रेमडेसिव्हिर इंजेक्शन हे घरात विलगीकरणात राहणाऱ्या, सौम्य लक्षणे आलेल्या असलेल्या रुग्णांनी घेऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. ‘एम्स’, आयसीएमआर-कोविड-१९ टास्क फोर्स व आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त देखभाल- देखरेख गटाने हे नवीन दिशानिर्देश जारी केले. त्यानुसार एकूण रुग्णांपैकी सौम्य लक्षणे असलेले, मध्यम लक्षण असलेले आणि गंभीर अवस्था असलेले अशा तीन गटांमध्ये विभागणी करण्यात करावी असा सल्ला राज्य सरकारांच्या आरोग्य यंत्रणांना देण्यात आला आहे.

ज्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सातत्याने ९०% च्या खाली गेलेली आहे असे रुग्ण गंभीर श्रेणीत मोडतात आणि त्यांना तपासणी करून तातडीने रुग्णालयात आणि अतिदक्षता विभागात दाखल केले पाहिजे असे यामध्ये म्हटले आहे. ज्यांची प्रकृती गंभीर नाही परंतु ज्यांना कोरोना संक्रमण झाले आहे अशा रुग्णांनी सिटी स्कॅन आणि एक्स-रे काढल्यानंतर रुग्णालयांमध्ये भरती व्हावे असे सांगण्यात आले. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी घरीच आयसोलेशनमध्ये राहावे, डॉक्टरांचा सल्ला वारंवार घ्यावा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत असे सांगण्यात आले आहे.