Heavy Rain : पावसामुळे सिक्कीममध्ये हाहाकार! रस्ते खचले, नऊ जणांचा मृत्यू,‘तिस्ता’ची पातळी वाढली

दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिक्कीम आणि परिसरात हाहाकार उडाला आहे.
sikkim landslide
sikkim landslidesakal
Updated on

गंगटोक/सिलिगुडी - दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिक्कीम आणि परिसरात हाहाकार उडाला आहे. एकाच रात्री सुमारे २२० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याने सर्व यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत.

तिस्ता नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून खोल दरीतून वाहणारी नदी आता रस्त्याच्या पातळीवर आल्याने त्याची तीव्रता लक्षात येते. काही भागातील रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. आतापर्यंत विविध घटनांत नऊ जणांचा मृत्यू झाला असून १२००-१४०० हून अधिक पर्यटक अडकले आहेत. पश्‍चिम बंगाल सरकारच्या वतीने हेल्प डेस्क सुरू करण्यात आला.

जिल्हा प्रशासनाने धोकादायक स्थितीतील शेकडो घरे रिकामी केली असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. भुस्खलनपिडीत नागरिकांना छावण्यात स्थलांतरित केले आहे. राष्ट्रीय महामार्ग-१० अनेक ठिकाणी खचला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प पडली. एकट्या उत्तर सिक्कीममध्ये शेकडो पर्यटक अडकले आहेत. सिक्कीम येथील नैसर्गिक संकट पाहून मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग (गोले) यांनी शपथविधी सोहळा आटोपताच तातडीची बैठक घेतली. गेल्या दोन दिवसांत नऊ जणांचा मृत्यू झाला असून दोघे बेपत्ता असल्याचे प्रशासनाने सांगितले.

राज्य पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, लाचुंग आणि चुंगथांग येथे १२०० पेक्षा अधिक देशातील आणि पंधरा परदेशी पर्यटक अडकले आहेत. यात दहा बांगलादेशचे, तीन नेपाळचे आणि दोन थायलंडचे नागरिक आहेत. सिक्कीममध्ये अडकलेल्या प्रवाशांची संख्या अधिक राहू शकते. अडकलेल्या प्रवाशांसाठी रंगपो येथे पर्यटक सुविधा हेल्प डेस्क सुरू केला आहे.

सिक्कीमचे मुख्य सचिव विजय भूषण पाठक म्हणाले, राज्यात दोन भूस्खलनामुळे तीन दिवसांत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगन जिल्ह्यात अजूनही १२०० ते १४०० पर्यटक अडकलेले आहेत. नामची जिल्ह्यात भूस्खलनात तीन जणांचा तर १२ आणि १३ जूनच्या रात्री मंगन जिल्ह्यात भूस्खलन झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. वाहतूक सुरू होण्यासाठी पाच ते सहा दिवस लागतील, असे पाठक यांनी नमूद केले.

पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलाची मदत मागितली आहे. वातावरण निवळले तर हेलिकॉप्टर सेवा घेता येईल, असे म्हटले आहे. सिक्कीम परिसरात पाणी पुरवठा ठप्प पडला अाहे तर वीज गायब झाली आहे. स्वयंसेवी संस्थांकडून गरजूंना अन्नाची पाकिटे दिली जात आहेत.

ठळक घडामोडी

  • मंगन जिल्ह्यात हजारो पर्यटक अडकले

  • दोन दिवसांत दोन भूस्खलनात नऊ जणांचा मृत्यू

  • दार्जिलिंग, कलिम्पोंग आणि गंगटोक यांच्यातील वाहतूक ठप्प.

  • साकलांग येथील पूल वाहून गेला.

  • दार्जिलिंगकडे जाणारे मार्ग बंद.

  • वीज, पाणी पुरवठा विस्कळीत, शेकडो घरांत पाणी

  • पूरग्रस्तांना खाद्यांच्या पाकिटाचे वाटप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.