तेलंगणात पावसाचा हाहाकार, हैदराबादमध्ये पूरस्थिती; 11 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

सतत सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे.

हैदराबाद- तेलंगणातील अनेक भागांमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे किमान 11 जणांचा मत्यू झाला आहे. यातील 9 जणांचा मृत्यू तर बदलागुडामधील मोहम्मदिया हिल्स येथील भिंत कोसळल्याने झाला आहे. मंगळवारी सतत सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. हैदराबादमध्ये तर जागोजागी पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी पाण्यावर कार तरंगताना दिसत आहेत. 

हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी याबाबत टि्वट केले आहे. मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मोहम्मदिया हिल्स येथे एक भिंत कोसळल्याने 9 जणांचा मृत्यू तर दोघे जखमी झाले आहेत. घटनास्थळावर जाऊन पाहणी करताना शहाबाद येथे अडकलेल्या बस प्रवाशांना मी लिफ्ट दिली आणि मी आता तालाबकट्टा आणि यसरब नगरकडे जात आहे, असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर तेलंगणात अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांनी सांगितले की, सर्व जिल्ह्यात प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. हैदराबादमधील अनेक भागात मागील 24 तासांत 20 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हैदराबाद नजीकचा परिसर, अट्टापूर मेन रोड, मुशीराबाद, टोली चौकी क्षेत्र आणि दम्मीगुडासह अनेक भाग पाण्याखाली बुडाला होता. रस्त्यांवर कंबरे इतके पाणी साचले आहे. नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. राज्याच्या आपत्कालीन विभागाकडून मदत कार्य सुरु आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in telangana hyderabad 11 dead