Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Breaking Marathi News Updates 10 July 2024: देशासह राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal

Kokan Live: रत्नागिरी- कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू

रत्नागिरी- कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू झाली आहे. पेडणे बोगद्यातील पाणी आणि ट्रॅकवर आलेली माती बाजूला करण्यात यश आल्यानं ही वाहतूक सुरु झाली. तब्बल 16 तासानंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू झाली. पेडणे बोगद्यातून पहिली मालगाडी गेली. 8 वाजून 5 मिनिटांनी रेल्वेची वाहतूक पेडणे बोगद्यातून सुरळीतपणे सुरु झाली. सध्या बोगद्यातून एकेक गाडी सोडली जात आहे.

Nashik Live : चिमुरडीला बसखाली चिरडणारा मद्यपी चालकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

आजोबांबरोबर शाळेतून घरी येणाऱ्या पाच वर्षाच्या बालिकेचा सिटी लीगच्या बस खाली येत मृत्यू झाला होता. घटना नाशिकरोडच्या मालधक्का धक्का सिटीलिंगच्या बस डेपो जवळ घडली. अपघातानंतर फरार झालेल्या आरोपीला काही तासांतच पोलिसांनी गजाआड केलं. या मद्यपीचा मेडिकल रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

नाशिकमध्ये दोन दिवसांत तिसरी 'हिट अँड रन'ची घटना घडली आहे. आरोपीला नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. नाशिक रोडच्या सिटीलिंक बस डेपोत सकाळी 12 वाजता घटना घडली होती.

Mumbai Live : विधानपरिषद निवडणुकीच्या अगोदर ठाकरे गटातील आमदारांचं स्नेहभोजन

विधानपरिषद निवडणुकीच्या अगोदर ठाकरे गटातील आमदारांचं स्नेहभोजन पार पडलं. आज परेल येथील ITC ग्रँड हॉटेल इथं हे स्नेहभोजन होत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील स्नेहभोजनासाठी उपस्थित राहणार आहेत. मुंबई पदवीधर आमदार अनिल परब निवडून आल्यानं हे स्नेहभोजन अनिल परब यांनी आयोजित केल्याची माहिती आहे. याशिवाय 12 तारखेला विधान परिषदेची निवडणूक असल्यानं आमदारांना हॉटेलमधेच ठेवणार असल्याची माहिती आहे. ठाकरे गटाचे आमदार ITC मध्ये आजपासून 12 जुलैपर्यंत राहणार आहेत.

Pune Accident Live: उरुळी कांचन येते अपघातात तरुणाचा मृत्यू

एंगेजमेंट अ‍ॅनिवर्सरी साजरी करण्यासाठी कंपनीतून दुपारून सुट्टी घेऊन दुचाकीवरून घरी निघालेल्या तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. पुणे - सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वाकडा पूल परिसरात दुचाकीने पाठीमागून ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ऋषिकेश विजय गायकवाड (वय- 27, रा. गोसावी वस्ती, आश्रम रोड, उरुळी कांचन, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Vishalgad Fort Live : विशाळ गडावरील अतिक्रमणासंदर्भात छत्रपती संभाजीराजे राजकारण करतायत; सकल हिंदू समाजाचा आरोप

संभाजी राजे खासदार असताना विशाळगडावरील अतिक्रमणा संदर्भात त्यांनी काय केलं? विशाल गडावरील 14 जुलैचे आंदोलन म्हणजे हिंदू समाजातील तरुणांची माथी भडकवणं आहे. विशाळगडावरील अतिक्रमणा संदर्भात प्रकरण न्याय प्रविष्ट असून काही दिवसातच निकाल लागणार आहे. विशाळगडावरील अतिक्रमण काढावे यासाठी सकल हिंदू समाजाने पहिल्यापासून पाठपुरावा केला आहे. संभाजी राजेंनी विशाळगडासह राज्यातील सर्वच किल्ले आणि गडकोटांवरील अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतली, तर सकल हिंदू समाज आणि शिवभक्त त्यांचं नेतृत्व मान्य करेल. 14 जुलै रोजी विशाळगडाच्या पायथ्यावर होणाऱ्या संभाजीराजांच्या आंदोलनाला हिंदू समाज जाणार नाही. अतिक्रमण लढा हा न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळे त्यांना न्यायालयातूनच उत्तर द्यावं लागणार आहे. त्यामुळे हिंदू समाज संभाजी राजांच्या आंदोलनाला जाणार नाही. कोल्हापुरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका स्पष्ट केली आहे.

Dhangar Reservation Live : धनगर आरक्षणासाठी विधीमंडळात बैठक सुरू

धनगर आरक्षणासाठी विधीमंडळात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. धनगर आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या शिष्टमंडळासोबत सरकार चर्चा करणार आहे. यामध्ये मंत्री गिरीश महाजन व मंत्री अतुल सावेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर व शेतकरी नेते सदाभाऊ खोतही उपस्थित आहेत. यावेळी लातूर येथील उपोषणकर्त्यांची सरकार समजूत काढणार आहे.

Nana Patole Live : नाना पटोले यांची MCA निवडणूकीमधून माघार

नाना पटोले MCA अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला नाही, त्यानंतर काँग्रेस कडून नाना पटोले समर्थक भूषण पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. दरम्यान नाना पटोले यांनी MCA निवडणूकीमधून माघार घेतली आहे. शरद पवार गटाकडून MCA उपाध्यक्ष संजय नाईक यांनी अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे.

Ajit Pawar live : विधानपरिषद निवडणुकीआधी अजित पवारांच्या दालनात राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक

विधानपरिषद निवडणुकीआधी अजित पवारांच्या दालनात राष्ट्रवादीची बैठक सुरु आहे. १२ जुलैला विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. त्याआधी ही महत्त्वाची बैठक होत आहे.

Swati Maliwal case LIVE : स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी बिभव कुमार यांना जामीन मिळणार? दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी स्वीय सचिव बिभव कुमार यांनी दाखल केलेल्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे. याबाबत शुक्रवार, 12 जुलै रोजी आदेश देऊ, असं न्यायालयानं म्हटलंय.

Pandharpur Ashadhi Wari LIVE : पंढरपूर येथील सभा मंडपाचे १७ ला उद्‌घाटन

सांबरा : निलजी येथील श्रीराम मंदिर ट्रस्ट व श्रीराम वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळातर्फे पंढरपूर येथे उभारलेल्या तुकाराम महाराज सभा मंडपाचा उद्‌घाटन सोहळा आयोजित केला आहे. सोमवारी (ता. १५) सकाळी ९ वाजता श्रीराम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त मेघा व मधू लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते तुकाराम महाराज सभामंडप वास्तूचे पूजन होईल. बुधवारी (ता. १७) आषाढी एकादशीला सकाळी ९ वाजता सौ. भारती व सतीश रामचंद्र धनुटकर दांपत्याच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. यावेळी श्रीराम सेतपूजन व अन्य धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

Worli hit and run Case LIVE : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला 16 तारखेपर्यंत पोलिस कोठडी

वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गाडीची नंबर प्लेट ही गहाळ असून तिचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. आरोपीने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी गाडीतच कापल्याचा पोलिसांनी न्यायालयात युक्तीवाद केला. इथे क्लिक करा

Ambeohol Dam live : कोल्हापुरात धरणग्रस्तांचा जलसमाधीचा प्रयत्न, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी

कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तूर येथील आंबेओहळ धरणस्थळावर धरणग्रस्तांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी १० जुलै रोजी जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा देऊनही प्रशासनाने कोणतीच पाऊले न उचलल्याने आज (ता.१०) अचानक आंदोलकांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. पोलीस प्रशासनाने आंदोलकांना अडवत जलसमाधी घेण्यापासून रोखले यामध्ये महिलांचीही संख्या मोठी होती.

Pune News live : भाजपमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला असे म्हणता येणार नाही - उमेश पाटील

पुणे : "देशात भाजपसोबत यापूर्वीही अनेक पक्षांनी आघाड्या केल्या आहेत. त्यांना कधी त्याचा फटका बसला नाही. एखाद्या निवडणुकीत कमी जागा मिळाल्या म्हणून भाजपमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला असे म्हणता येणार नाही.' असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी बुधवारी व्यक्त केले.

Arvind Kejriwal live : विधानसभा निवडणुकीपूर्वी केजरीवालांना मोठा झटका; 'आप'च्या माजी मंत्र्याचा अनेक नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश

दिल्ली सरकारमधील माजी मंत्री राजकुमार आनंद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी दिल्ली सरकारला अनुसूचित जातीविरोधी म्हणत मंत्रिपदासह आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांनी बसपमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा निवडणूक लढवली, परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

सोलापुरात दुधासाठी ठाकरे गटाचे आंदोलन

राज्य सरकारच्या विरोधात सोलापुरात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. गाईच्या दुधाला प्रति लिटर 40 तर म्हशीच्या दुधाला 70 रुपतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी ठाकरे गटाच्यवतीने आंदोलन करण्यात आले.

Nashik News: जिल्हा रुग्णालयातील गलथान कारभाराविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

नाशिकच्या संदर्भ रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयातील गलथान कारभाराविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. संदर्भ रुग्णालयातील औषधांचा तुटवडा आणि जिल्हा रुग्णालयातील नादुरुस्त शवागराविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

Atishi Marlena Live : दिल्लीमध्ये वीज खरेदी समायोजन शुल्क वाढवल्याच्या आरोपावर ऊर्जा मंत्री 'आतिषी' आक्रमक

दिल्ली सरकारने वीज बिलांमध्ये वीज खरेदी समायोजन शुल्क (पीपीएसी) वाढवल्याच्या भाजपच्या आरोपावर ऊर्जा मंत्री आतिषी म्हणाल्या, भाजपची समस्या ही आहे की जिथे जिथे त्यांची सरकारी वीज आहे तिथे महाग आहे. दिल्ली सरकारवर खोटे आरोप लावत आहे की पीपीएसी कमी कालावधीत सुमारे 7% पर्यंत वाढवू शकते.

Shehzad Poonawalla Live : रामनगरचे नाव बदलावे, डी.के. शिवकुमार यांच्या प्रस्तावावरून गोंधळ

कर्नाटक सरकारचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी रामनगर जिल्ह्याचे नाव बदलून बेंगळुरू दक्षिण करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे, त्यावर भाजप नेते शेहजाद पूनावाला म्हणले...आज काँग्रेसचा हिंदूद्वेष आणि रामविरोधी मानसिकता टोकाला पोहोचली आहे.

Gautam Gambhir Live : गौतम गंभीरची Team India च्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती; काय म्हणाले संजय भारद्वाज

जेव्हाही गौतमने आव्हान स्वीकारले, तेव्हा तो यशस्वी झाला आहे, त्याने 2008 मध्ये रणजी ट्रॉफी, या वर्षी KKR साठी आयपीएल, 2007 टी-20 विश्वचषक, 2011 विश्वचषक जिंकला. आव्हान पेलण्याची आणि संघाला पुढे नेण्याची क्षमता त्याच्यात आहे.

PM Modi Russia-Austria Visit Live : पंतप्रधानांच्या रशिया-ऑस्ट्रिया दौऱ्यावर चौथाईवाले स्पष्टचं बाेलले

पंतप्रधान मोदीं रशिया आणि ऑस्ट्रिया दौऱ्यावर आहेत भारतीय जनता पक्षाचे डॉ. विजय चौथाईवाले यांच्या मते याचे दोन पैलू आहेत, पहिले -भारतामधील द्विपक्षीय संबंध मजबूत करणे; दुसरे म्हणजे जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी मोदीजींना 15 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. एक भारतीय पंतप्रधान 40 वर्षांच्या कालावधीनंतर ऑस्ट्रियाला भेट देत आहेत.

Winter Session 2024 : विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक सुरु

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरु झाली आहे. विधानसभेतील गदारोळावर या बैठकीत चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.

शरद पवारांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक

सिल्व्हर ओक निवासस्थानी आज सायंकाळी ४ वाजता आमदारांची बैठक होणार असून शरद पवार आपल्या पक्षाच्या सगळ्या आमदारांशी चर्चा करणार आहेत.

मिहीर शाह ज्या बारमध्ये बसला होता, त्या बारवर आज कारवाई होणार

वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपी मिहीर शहा आणि त्याचे मित्र ज्या बारमध्ये घटनेच्या अगोदरच्या रात्री होते, त्या बारवर आज महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेच्या के पश्चिम प्रभाग कार्यालयाच्या अतिक्रमण निष्काशन विभागाकडून ही कारवाई करण्यात येणार असून बारा वाजता या कारवाईला सुरुवात होणार आहे.

Nashik Live Updates : जमिनीच्या वादातून वृद्धाला पेटवले

निफाडच्या खर्डी सारोळे गावातील कचेश्वर नागरे यांना जमिनीच्या वादातून पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

Manoj Jarange Patil Live: मनोज जरांगेंनी घेतली धनगर आंदोलकांची भेट

मनोज जरांगे पाटील धनगर आंदोलकांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत. धनगर आंदोलक गेल्या १३ दिवसांपासून लातूरमध्ये उपोषण करत आहेत. आंदोलकांची भेट घेऊन जरांगेंनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं.

Prahar Agitation News: प्रहार संघटनेचं ऑनलाईन जुगाराविरोधात आंदोलन

प्रहार संघटनेचं ऑनलाईन जुगाराविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. ऑनलाईन जुगार बंद करा या मागणीसाठी आंदोलन होत होते. मात्र आंदोलनाच्या आधीच बच्चू कडू आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Sanjay Raut Live: मोदींना रशियाचा पुरस्कार मिळालाय, नोबेल नाही- संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाचा पुरस्कार मिळालाय. नोबेल नाही. पुतिन कोणालाही पुरस्कार देऊ शकतात. तिथे कोणीही विरोधक नाही, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या रशिया दौऱ्यावर टीका केली आहे.

Mumbai Water News Live मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट अजूनही कायम

मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट अजूनही कायम आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये सुमारे 20% पाणीसाठा आहे. धरणांमध्ये किमान 80% पाणीसाठा झाल्यास पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे मुंबईकरांवर अजूनही पाणी टंचाईची टांगती तलवार कायम राहणार आहे

worli Hit And Run Live: वरळी हिट अँड रन प्रकरणी एसआयटी चौकशी करा- विजय वडेट्टीवार

पब आणि बार सकाळी पाचवाजेपर्यंत सुरु राहतात. आरोपीला वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह येऊ नये यासाठी मिहीर शहा गायब होता. याप्रकरणी एसआयटी चौकशी केली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

IMD Rain Prediction Live: हवमान विभागाचा अंदाज पुन्हा फेल

हवामान विभागाने मंगळवारी मुंबईत रेड अलर्ट जारी केला होता. त्यामुळे शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली होती. पण, हवमान विभागाच अंदाज चुकीचा ठरल्याचं चित्र आहे.

Weather Updates Live: 'या' राज्यांत जोरदार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने पुढील २-३ दिवसात ईशान्य आणि पूर्वेकडील राज्यांत जोरदार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Maharashtra Live: कल्याणकारी कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी 50 हजार तरुणांची नियुक्ती

महाराष्ट्र सरकारने राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी 50 हजार तरुणांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

PM Modi Austria Live: पंतप्रधान मोदींचे ऑस्ट्रियामध्ये 'वंदे मातरम्'ने स्वागत

रशियानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रिया दौऱ्यावर पोहचले आहेत. तेथे त्यांचे 'वंदे मातरम्'हे गीत वाजवत स्वागत करण्यात आले.

Assembly By-poll Live: 7 राज्यांतील विधानसभेच्या 13 जागांसाठी मतदान सुरू

बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या सात राज्यांमधील 13 विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे.

Maharashtr News Live: राज्यात मुसळधार पाऊस ते विधान परिषद निवडणुकीची लगबग, एका क्लिकवर वाचा महत्त्वाच्या घडामोडी

Breaking Marathi News Updates 10 July 2024 : राज्यासह देशातील विविध भगांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत सुमारे 100 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियानंतर ऑस्ट्रिया दौऱ्यावर गेले आहेत.

महाराष्ट्रात 12 जुलै रोजी 11 जगांसाठी विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्यात मतांची जुळवाजुळव करण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू आहेत.

दरम्यान देशातील 7 राज्यांत 13 विधानसभा जागांवर आज पोटनिवडूक होत आहे. त्यासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.

यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.