लढवय्या गमावला

कोईमतूरला लागून असलेल्या सुलूर येथील हवाई दलाच्या तळावरून रावत आणि इतरांना घेऊन हेलिकॉप्टर वेलिंग्टनच्या दिशेने झेपावले होते.
Helicopter Accident
Helicopter AccidentSakal

चेन्नई/नवी दिल्ली - सुरक्षा दलांप्रमाणेच अवघ्या देशासाठी आजचा दिवस मोठा धक्कादायक ठरला. सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत आणि अन्य काही जणांना घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाचे ‘एमआय-१७ व्ही ५’ हे हेलिकॉप्टर दुपारी साडेबाराच्या सुमारास तमिळनाडूतील कुन्नूरजवळील घनदाट जंगलामध्ये कोसळले. या भीषण अपघातामध्ये जनरल रावत (वय ६३), त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह अन्य अकरा जणांचा मृत्यू झाला.

देशाचे पहिले सरसेनाध्यक्ष असलेले जनरल रावत यांच्या जाण्याने झुंजार रणसेनानी काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षणमंत्री राजनाथसिंह आदी मान्यवरांनी रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

कोईमतूरला लागून असलेल्या सुलूर येथील हवाई दलाच्या तळावरून रावत आणि इतरांना घेऊन हेलिकॉप्टर वेलिंग्टनच्या दिशेने झेपावले होते. येथील लष्करी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात रावत सहभागी होणार होते. मात्र कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधीच ते कोसळले. हेलिकॉप्टर कोसळताच काही क्षणांमध्ये त्याने पेट घेतला. हे हेलिकॉप्टर मानवी वस्तीपासून दूर अंतरावर कोसळल्याने मोठी जीवितहानी टळल्याचे बोलले जाते.

ज्या निलगिरी जिल्ह्याला लागून असलेल्या कट्टेरी-नानचप्पनत्रम् या भागात हा अपघात घडला तिथे मोठ्या प्रमाणावर धुके होते, दृश्यमानता कमी असल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त होतो आहे. हवाई दलाने या दुर्घटनेची तज्ज्ञांच्या विशेष समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याचे जाहीर केले आहे. या दुर्घटनेमध्ये मृतदेह होरपळले असून त्यांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येईल. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्यावर सध्या वेलिंग्टनमधील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती हवाई दलाने दिली आहे. रावत यांचे पार्थिव उद्या (ता.९) रोजी दिल्लीत आणले जाणार असून त्यानंतर त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. रावत यांच्या मागे त्यांच्या दोन मुली आहेत. अपघाताचे वृत्त समजल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी रावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जात कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.

Helicopter Accident
पाक-चीनला धडकी भरवणारी CDS बिपीन रावत यांची वक्तव्ये

आगडोंब उसळला

ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळले होते तिथे मोठा आगडोंब उसळला होता. यामुळे शेजारील झाडांनी पेट घेतला. घटनास्थळावरून धुराचे अक्षरशः लोट उसळत होते. स्थानिक नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यानंतर जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, अपघात झालेल्या हेलिकॉप्टरमधून नेमके किती अधिकारी प्रवास करत होते याची ठोस माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

‘तो’ डोंगराळ भाग

ज्या भागात हे हेलिकॉप्टर कोसळले तो डोंगराळ असल्याने धुक्यामुळे दृश्यमानता कमी होती. मदत आणि बचाव कार्यामध्येही अडथळे येत होते. या दुर्घटनेच्या माहितीनंतर कोईमतूरमधील वैद्यकीय पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

संरक्षणमंत्री पंतप्रधानांना भेटले

तमिळनाडूतील या दुर्घटनेची माहिती मिळताच दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू झाले. संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांना या दुर्घटनेची माहिती दिली. ते उद्या (ता.९) रोजी संसदेमध्ये निवेदन करणार आहेत. खुद्द संरक्षणमंत्र्यांनी आज तातडीने लष्करी अधिकाऱ्यांची बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. ते तमिळनाडूला जाणार नसल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेलिकॉप्टरमधील महत्त्वाच्या व्यक्ती

जनरल बिपिन रावत, सौ.मधुलिका रावत, ब्रिगेडिअर एल.एस लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदरसिंग, नायक गुरसेवकसिंग, नायक जितेंद्रकुमार, लान्सनायक विवेक कुमार, लान्सनायक बी. साई तेजा, हवालदार सतपाल

याआधीही अपघातातून बचावले

जनरल बिपिन रावत हे याआधी देखील एका भीषण हेलिकॉप्टर अपघातातून बचावले होते. ही घटना ३ फेब्रुवारी २०१५ रोजी घडली होती. रावत हे त्यावेळी नागालँडमधील दिमापूर येथील लष्कराच्या ‘३-कोअर’च्या मुख्यालयाचे प्रमुख होते. त्यावेळी लेफ्टनंट जनरल असलेल्या रावत यांनी ‘चित्ता’ हेलिकॉप्टरने दिमापूरहून उड्डाण केले होते. काही उंचीवर गेल्यानंतर वैमानिकाचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले आणि ते कोसळले. इंजिनमधील बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी रावत यांना किरकोळ दुखापत झाली होती.

Helicopter Accident
अखेरच्या भाषणात बिपीन रावतांनी दिला होता जैविक युध्दाचा इशारा!

दिवसभरात

  • पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरक्षा समितीची बैठक

  • संरक्षण मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बैठकांचे सत्र

  • निलगिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून घटनास्थळाचा आढावा

  • भारतीय हवाई दलाकडून दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश

  • तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाचा आढावा

  • राष्ट्रपती कोविंद यांचा राजभवनातील कार्यक्रम रद्द

घटनाक्रम

  • सकाळी ९.०० वा. : जनरल रावत यांचे विशेष विमानाने दिल्लीतून प्रस्थान

  • सकाळी ११.३० वा. : सुलूर हवाई तळावर उतरले

  • सकाळी ११.४५ वा. : हेलिकॉप्टरचे वेलिंग्टनकडे उड्डाण

  • दुपारी १२.२० वा. : हेलिकॉप्टर नानचप्पनचत्रम् कटेरीत कोसळले

अपघातस्थळ किती लांब

  • सुलूर हवाईतळापासून : ९४ किलोमीटर

  • वेलिंग्टन कॉलेजपासून : १६ किलोमीटर

  • लष्करी छावणीपासून : ५ मिनिटे

जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचे अकाली जाणे धक्कादायक तसेच वेदनादायी आहे. देशाने आपला शूरवीर पुत्र गमावला आहे. त्यांनी आपल्या चार दशकांच्या देशसेवेत अतुलनीय शौर्य आणि नेतृत्त्वाचा ठसा उमटविला.

- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

जनरल रावत यांनी अतुलनीय धैर्य आणि परिश्रमाने देशाची सेवा केली. पहिले सरसेनाध्यक्ष या नात्याने त्यांनी आपल्या सशस्त्र दलांच्या एकत्रीकरणासाठी योजनांची आखणी केली होती.

- राजनाथसिंह, संरक्षणमंत्री

जनरल बिपिन रावत यांचे गतिमान आणि प्रेरणादायी नेतृत्व आमच्या आठवणींमध्ये चिरंतन कोरले जाईल. भारतीय सशस्त्र सेनादले त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल सदैव ऋणी राहतील.

- जनरल मनोज नरवणे, लष्करप्रमुख

जनरल रावत हे उत्कृष्ट सैनिक होते. सच्चे देशभक्त या नात्याने त्यांचे सशस्त्र सेनादलांच्या आणि सुरक्षा यंत्रणांच्या आधुनिकीकरणातील योगदान मोठे आहे. सामरिक मुद्द्यांवर त्यांची माहिती आणि आकलन अचूक होते. त्यांची सेवा देश कधीही विसरणार नाही.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com