नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये पडलेले हवाई दलाचे "एमआय-17' हेलिकॉप्टर भारतीय क्षेपणास्त्रामुळेच कोसळल्याचे उच्चस्तरीय चौकशीत निष्पन्न झाले आहे. या संदर्भात हवाई दलाचे पाच अधिकारी दोषी आढळल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली.
बालाकोटमधील "जैशे महंमद'च्या दहशतवादी तळावर हवाई दलाने केलेल्या हल्ल्यानंतर 27 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्या वेळी झालेल्या संघर्षात क्षेपणास्त्राच्या माऱ्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळून त्यात एक नागरिक व सहा लष्करी कर्मचारी ठार झाले होते. या चौकशीत आढळलेल्या तथ्याबद्दल हवाई दलाने अद्याप काही प्रतिक्रिया दिली नाही.
एअर कमोडोरच्या हुद्द्यावरील अधिकाऱ्यामार्फत या घटनेची लष्करी न्यायालयाद्वारे चौकशी करण्याचा आदेश हवाई दलाच्या मुख्यालयाने दिला होता. या न्यायालयाने सहा महिने केलेल्या चौकशीत हवाई दलाचे "एमआय-17 व्ही-5' हे हेलिकॉप्टर हवाई दलाने जमिनीवरून केलेल्या क्षेपणास्त्राच्या माऱ्याने कोसळल्याचे निष्पन्न झाले. हेलिकॉप्टर श्रीनगरच्या तळाकडे परतत असताना ही घटना घडली होती. या संदर्भात श्रीनगरच्या हवाई तळाच्या मुख्य कार्यगत अधिकाऱ्यासह हवाई दलाचे पाच अधिकारी जबाबदार असल्याचेही आढळले आहे. याप्रकरणी दोषी असणाऱ्यांना लष्करी कायद्यानुसार कठोर शिक्षा होईल आणि हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी शिक्षेचे स्वरूप ठरवतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी श्रीनगरच्या हवाई दल तळावरील मुख्याधिकाऱ्याची मे महिन्यात बदली करण्यात आली होती.
या हेलिकॉप्टरमधील "मित्र की शत्रू' हे ओळखणारी यंत्रणा (आयएफएफ) बंद होती आणि त्याच वेळी जमिनीवरील कर्मचारी आणि हेलिकॉप्टरमधील कर्मचारी यांच्यात समन्वय आणि संभाषणात "मोठी त्रुटी' राहिल्याचे या चौकशीत आढळले आहे.
"आयएफएफ' यंत्रणेमुळे विमान किंवा हेलिकॉप्टर आपले आहे की शत्रूचे, हे ओळखण्यास रडार यंत्रणेला मदत होते. भारत आणि पाकिस्तानची लढाऊ विमाने नौशेरा परिसरात झुंजत असताना सकाळी दहा वाजता हे हेलिकॉप्टर कोसळले होते. उड्डाणानंतर दहा मिनिटांत ते कोसळले. लढाऊ विमानांचा संघर्ष सुरू असल्यामुळे या हेलिकॉप्टरला श्रीनगरच्या तळाकडे परतण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, ते शत्रूचे हेलिकॉप्टर असल्याचे समजून जमिनीवर असलेल्या हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यावर क्षेपणास्त्र डागले. हे हेलिकॉप्टर कोसळले तेव्हा हवाई संरक्षण यंत्रणा काय करत होती, याचीही चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
|