पूर्वांचल हायवे| भारतात 'या' महामार्गांवर होतं इमर्जन्सी लँडिंग! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूर्वांचल हायवे| भारतात 'या' महामार्गांवर होतं इमर्जन्सी लँडिंग!

पूर्वांचल हायवे| भारतात 'या' महामार्गांवर होतं इमर्जन्सी लँडिंग!

sakal_logo
By
ओमकार वाबळे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज उत्तर प्रदेशातील सुलतानपुरात पूर्वांचल एक्सप्रेसवेचं उद्घाटन केलं. उद्घाटनाच्या आधी मोदींनी महामार्गावरच विमान उतरवत इमर्जन्सी लँडिंग पॅच अनुभवून पाहिला. मोदींच्या या खास लँडिंगचा विषय माध्यमांमध्ये चर्चेचा ठरला. भारतीय वायु सेनेच्या C-130J या सुपर हर्क्युलस विमानातून ते आले. थेट एक्सप्रेसवेवर विमान उतरल्याने सध्या मोदींच्या या ब्रँडिंग फंड्याची चर्चा आहे. मात्र, देशभरात असे अनेक महामार्ग आहेत, ज्यावर इमर्जन्सी लँडिंगची सुविधा करण्यात आली आहे.

भारत इमर्जन्सी लँडिंग सुविधा विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. राजस्थानमधील राष्ट्रीय महामार्ग 925A वर यासाठी 3 किमीचा पॅच पहिल्यांदा तयार करण्यात आला. या व्यतिरिक्त आधीपासूनच कार्यरत असलेल्या 19 ठिकाणी अशा पद्धतीचं इमर्जन्सी लँडिंग करता येऊ शकतं, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलंय.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विमानांच्या तत्काळ लँडिंगसाठी आवश्यक हवाईपट्ट्यांची घोषणा केली होती. यामध्ये देशातील अन्य 19 ठिकाणांचा समावेश आहे. फलोदी – जैसलमेर रस्ता आणि राजस्थानमधील बारमेर – जैसलमेर रस्ता, पश्चिम बंगालमधील खरगपूर – बालासोर रस्ता, खरगपूर – केओंजर रस्ता आणि पानागढ/KKD, चेन्नईजवळील रस्त्यांचा समावेश आहे.

तामिळनाडूमध्ये पुद्दुचेरी रोडवर, आंध्र प्रदेशात नेल्लोर-ओंगोल रोड आणि ओंगोल-चिलाकालुरीपेट रोडवर, हरियाणात मंडी डबवली ते ओधन रोडवर, पंजाबमध्ये संगरूरजवळ, गुजरातमध्ये भुज-नलिया रोड आणि सुरत-बडोदा रोडवर, जम्मू-काश्मीरमध्ये बनिहाल-श्रीनगर रस्ता, आसाममधील लेह/न्योमा परिसरात आणि जोरहाट-बाराघाट रस्त्यावर, शिवसागरजवळ, बागडोगरा-हाशिमारा रस्ता, हाशिमारा-तेजपूर मार्ग आणि आसाममधील हाशिमारा-गुवाहाटी मार्गावर, इमर्जन्सी लँडिंग सुविधा असतील, असे गडकरी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक दर्जाच्या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम विक्रमी गतीने सुरू असल्याचं गडरींनी म्हटलं होतं. येणाऱ्या काळात हे राष्ट्रीय महामार्ग लष्करासाठीही उपयोगी पडतील,असं त्यांनी म्हटलं. यामुळे देश अधिक सुरक्षित होईल आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी सदैव सज्ज राहील, असं वक्तव्य गडकरींनी केलं होतं. त्यानुसार देशभरात सुरू असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर इमर्जन्सी लँडिंगची सुविधा करण्यात आली आहे.

loading image
go to top