हिजाब युवतीला जवाहिरीची शाबासकी

हिजाबवरून चर्चेत आलेली युवती मुस्कान खान हिला अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी याने शाबासकी
अयमान अल-जवाहिरी
अयमान अल-जवाहिरी sakal

नवी दिल्ली : हिजाबवरून चर्चेत आलेली युवती मुस्कान खान हिला अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी याने शाबासकी दिली आहे. भारतामधील मूर्तिपूजक हिंदू लोकशाही मुस्लिमांची दडपशाही करीत असल्याचा आरोपही त्याने केला.हिजाबवरून भारतात निर्माण झालेल्या वादात अल-जवाहिरी याने उडी घेतली. त्याने एक चित्रफीत जारी केली. ही चित्रफीत नऊ मिनिटांची आहे. शबाब मीडिया या अल-कायदाच्या प्रसारमाध्यम संस्थेने ही चित्रफीत जारी केली. अमेरिकास्थित साइट (SITE) या गुप्तचर संस्थेने त्याची खातरजमा केली. कर्नाटकमधील अनेक संस्थांनी हिजाब घालून प्रवेश करण्यास मनाई केली आहे. फेब्रुवारीत एका महाविद्यालयात भगव्या रंगाची उपरणी घातलेल्या मुलांच्या गटाकडून घोषणा दिल्या जात असताना मुस्कानने हिजाब घालून घोषणा दिली होती.

फ्रान्स इस्लामचा शत्रू

अल-जवाहिरीने या चित्रफितीत फ्रान्ससह काही देश इस्लामचे शत्रू असल्याचा उल्लेख केला. नेदरलँड््स, स्वित्झर्लंड, मोरोक्को तसेच इजिप्त या देशांचा त्याने उल्लेख केला. या देशांचे धोरण हिजाबविरोधी असल्याचे कारण त्याने नमूद केले.

अल-जवाहिरी जिवंत...

अल-जवाहिरी याचा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाल्याच्या चर्चेवर या चित्रफितीमुळे पडदा पडला. मुस्कान ही महान भारतीय महिला असल्याचे त्याने म्हटले आहे. हिंदू भारताचे सत्य उघडकीस आणल्याबद्दल अल्लाने तिला बक्षीस द्यावे, असेही तो म्हणतो.

‘छुप्या शक्तींचा हात असल्याचे सिद्ध’

बंगळूरः अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी याच्या चित्रफितीला कर्नाटकच्या दोन मंत्र्यांनी परखड प्रत्युत्तर दिले. हिजाब वादात छुप्या शक्तींचा हात असल्याचा आपले तसेच न्यायालयाचे म्हणणे यामुळे सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र आणि उच्च शिक्षण मंत्री सी. एन. अश्वथनारायण यांनी यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्ञानेंद्र म्हणाले की, पोलिस खात्याचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. हिजाब वादात आमच्याप्रमाणेच उच्च न्यायालयानेही हिजाब वादात काही छुप्या शक्तींचा हात असल्याचे म्हटले होते. जे काही घडते आहे, कशाचा संबंध आहे हे पोलिस शोधून काढतील. अश्वथनारायण यांनी देशाच्या अंतर्गत बाबींविषयी एका दहशतवादी गटाने केलेल्या विधानाचा निषेध केला. त्यांच्याशी संबंधित संघटना आणि व्यक्तींविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

मुस्कान विद्यार्थिनी, तिला शिकायचेय..

महंमद हुसेन यांनी मुस्कान हिने ही चित्रफीत पाहिल्याचे सांगितले. ती अजून विद्यार्थिनी असून तिला शिकायचे आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले की, लोक त्यांना हवे ते काहीही म्हणतात. त्यामुळे अकारण संकट निर्माण होते. आम्ही आमच्या देशात शांततेत राहात आहोत. त्याने (अल-जवाहिरी) आमच्याबद्दल बोलू नये असे आम्हाला वाटते, कारण तो आमच्याशी संबंधित नाही. हे चुकीचे आहे. आमच्यात दुही निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.

मुस्कानचे वडील म्हणतात, भारतात शांततेत राहतो

मंड्या, कर्नाटक : हिजाब वादास कारणीभूत ठरलेली युवती मुस्कान खान हिचे पिता महंमद हुसेन खान यांनी अल-कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरी याचे वक्तव्य चुकीचे असल्याचे परखडपणे सांगितले. आपण आणि आपले कुटुंब भारतात शांततेत राहात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अल-जवाहिरी याने मुस्कानचे कौतुक केले. चित्रफितीद्वारे त्याने केलेल्या विधानापासून स्वतःला दूर ठेवण्यास महंमद हुसेन यांनी पसंती दिली. ते म्हणाले की, अशा प्रसंगांमुळे कुटुंबाच्या शांततेत बाधा येते. पोलिस आणि राज्य सरकार सत्य शोधून काढण्यासाठी कोणतीही चौकशी करू शकतात. आम्हाला चित्रफितीबद्दल काहीही कल्पना नाही. तो कोण आहे हे आम्हाला माहीत नाही. मी आज त्याला प्रथमच पाहिले. तो अरबी भाषेत काहीतरी बोलला आहे. आम्ही सारे येथे प्रेमाने आणि भावाच्या विश्वासाप्रामाणे राहात आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com