धक्कादायक! हिमाचलप्रदेश विधानसभेच्या गेटवर खलिस्तानी झेंडे; पाहा व्हिडीओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खलिस्तानी झेंडे

धक्कादायक! हिमाचलप्रदेश विधानसभेच्या गेटवर खलिस्तानी झेंडे; पाहा व्हिडीओ

धर्मशाळा : हिमाचल प्रदेश विधानसभेच्या मुख्य प्रवेशद्वारावर खलिस्तानी झेंडे लावण्यात आल्याची घटना घडली आहे. विधानसभेच्या बाहेर हे झेंडे लावलेले आढळून आले असून त्याच्यावर खलिस्तान असं नाव लिहिलेलं आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी तात्काळ झेंडे उतरवले असून स्थानिक लोकांनी हे कृत्य केलं असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. अधिक तपास आणि चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

हिमाचलप्रदेशमधील धर्मशाळा येथील तपोवन येथे असलेल्या या विधानसभा भवनाच्या गेटवर हे झेंडे लावण्यात आले आहेत. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून झेंडे काढले आहेत आणि स्थानिकांची चौकशी सुरू केली आहे.

कांगडा येथील एसपी खुशाल शर्मा यांनी सांगितलं की, "हे झेंडे साधारण पहाटेच्या दरम्यान लावले असावेत. पंजाबमधून आलेल्या पर्यटकांनी सुद्धा हे कृत्य केलं असेल त्याबाबत आम्ही चौकशी करत आहोत." दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या घटनेचा निषेध केला आहे. "या विधानसभा भवनामध्ये फक्त हिवाळी अधिवेशन होत असतात त्यामुळे या ठिकाणी फक्त अधिवेशनावेळी जास्त सुरक्षा ठेवली जाते." असं सांगत झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

उपायुक्त डॉ. निपुण जिंदाल यांनी या घटनेला दुजोरा दिला असून ते म्हणाले की, गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासात असून गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल. दरम्यान मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी तपास आणि कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान यापूर्वी सिख फॉर जस्टिसचे (SFJ) प्रमुख गुरुपतवंत सिंग पन्नू यांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून भिंद्रनवाला आणि खलिस्तानचा ध्वज शिमल्यात फडकवला जाईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर हिमाचलप्रदेश सरकारने भिंद्रनवाला आणि खलिस्तानचा ध्वज असणाऱ्या वाहनांवर राज्यात बंदी घातली होती. त्यानंतर SFJ या संघटनेने २९ मार्च रोजी खलिस्तानी झेंडा फडकवण्याचं जाहीर केलं होतं पण कडक सुरक्षेमुळे तसं करता आलं नव्हतं.

टॅग्स :Himachal Pradesh