आता ‘वन नेशन वन लँग्वेज’; अमित शहा यांचे ट्विट

टीम ई-सकाळ
Saturday, 14 September 2019

नवी दिल्ली : ‘वन नेशन वन टॅक्स’, ‘वन नेशन वन पॉवर ग्रीड’, ‘वन नेशन वन इलेक्शन’नंतर आता भाजपने ‘वन नेशन वन लँग्वेज’चा मानस बोलून दाखवला आहे. याला निमित्त हिंदी भाषा दिन ठरला आहे. भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘वन नेशन वन लँग्वेज’चा मुद्दा उपस्थित केला आहे.

नवी दिल्ली : ‘वन नेशन वन टॅक्स’, ‘वन नेशन वन पॉवर ग्रीड’, ‘वन नेशन वन इलेक्शन’नंतर आता भाजपने ‘वन नेशन वन लँग्वेज’चा मानस बोलून दाखवला आहे. याला निमित्त हिंदी भाषा दिन ठरला आहे. भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘वन नेशन वन लँग्वेज’चा मुद्दा उपस्थित केला आहे. हिंदी भाषा दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अमित शहा यांनी प्रत्येकाने जास्तीत जास्त हिंदीचा वापर करावा, असे आवाहन केले. विशेषतः ईशान्येकडील राज्यांमध्ये प्रत्येक मुलाला हिंदी शिकवली पाहिजे, असेही शहा यांनी सांगितले.

आणखी वाचा : उदयनराजे भाजपमध्ये; फायदा कोणाचा? तोटा कोणाचा?

काय आहे हिंदी भाषा दिवस?
हिंदी भाषा दिवस हा व्यौहार राजेंद्र सिंह यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो. व्यौहार सिंह यांचा जन्म १४ सप्टेंबर १९०० रोजी मध्य प्रदेशात जबलपूरमध्ये झाला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यासाठी सिंह यांनी धडपड केली होती. काका कालेलकर, मैथिलीशरण गुप्त, हजारी प्रसाद द्विवेदी, सेठ गोविंद दास यांच्या मदतीने त्यांनी हिंदीसाठी मोठा लढा दिला होता. अमेरिकेत झालेल्या जागतिक धर्म परिषदेतही सिंह यांनी भारताकडून प्रतिनिधित्व केले होते. त्या परिषदेत त्यांनी हिंदीतूनच भाषण केले होते.

आणखी वाचा : भाजपच्या सत्तालालसेला शिवसेनेचा खो!

कलम ३४३नुसार हिंदी अधिकृत भाषा
भारतीय संविधानाने कलम ३४३नुसार हिंदी अधिकृत भाषा स्वीकारली आहे. भारतात पहिला हिंदी दिवस १९५३मध्ये साजरा करण्यात आला. सध्या भारतात केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये संवादासाठी प्राथमिक भाषा ही हिंदीच आहे. संविधानाने राज्य सरकारांना त्यांची त्यांची अधिकृत भाषा स्वीकरण्याची मुभा देण्यात आली आहे. संविधानात हिंदी आणि इंग्रजीसह २२ भाषा अधिकृत भाषा स्वरूपात देण्यात आल्या आहेत. हिंदी दिनाच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

आणखी वाचा : हाती 'शिवबंधन' बांधल्यानंतर, मिलिंद नार्वेकरांविषयी काय म्हणाले भास्कर जाधव

‘वन नेशन वन लँग्वेज’चा स्वीकार होणार?
दरम्यान, आज, हिंदी भाषा दिवसाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ‘वन नेशन वन लँग्वेज’चा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारत विविध भाषांचा देश आहे. त्यातील प्रत्येक भाषेला त्याचे त्याचे एक वेगळे महत्त्व आहे. पण, देशाची एकच भाषा असणे, अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे जगात आपली वेगळी ओळख निर्माण होईल. आज, देशाला एकत्र बांधण्याचे काम कोणती भाषा करत असले तर ती हिंदी आहे. अर्थातच ती सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. आपल्या देशात उत्तर भारतात हिंदी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असली तरी, दक्षिणेतील राज्यांनी हिंदीला स्वीकारलेले नाही. तसेच पूर्वेकडील राज्यांमध्ये कामकाजासाठी त्या त्या राज्यांची भाषाच वापरली जाते. ‘वन नेशन वन लँग्वेज’ ही राज्ये स्वीकारणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hindi bhasha din home minister amit shah twitter one nation one language