बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधीच विरोधकांना झटका

उज्‍ज्वल कुमार - सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 21 August 2020

मांझी हे त्यांच्या मुलाच्या साहाय्याने ‘जेडीयू’शी वाटाघाटी करतील, अशीही चर्चा आहे. लालूप्रसाद यादव यांचे व्याही चंद्रिका यादव, फराज फातमी व जयवर्धन यांनी आजच ‘जेडीयू’त प्रवेश केला आहे. 

पाटणा  - बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या आधीच हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे (हम) अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) व काँग्रेसच्या महाआघाडीशी नाते तोडले आहे. यामुळे विरोधकांना मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.

मांझी म्हणाले, ‘‘आरजेडी’ नेते तेजस्वी यादव जिद्दी असून कोणाचेही काही ऐकून घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणे शक्‍य नाही.’’ जीतनराम मांझी हे बिहारमधील महादलित समाजाचे मोठे नेते आहेत. ते बरोबर नसणे हे महाआघाडीसाठी मोठे नुकसानकारक ठरू शकते, अशी चर्चा आहे. महाआघाडीतून बाहेर पडल्यानंतर जीतनराम मांझी कोणते पाऊल उचलतात, याबद्दल बिहारमधील राजकीय क्षेत्रात उत्सुकता आहे. त्यांचा ‘हम’ पक्ष ‘एनडीए’त सहभागी होणार की मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलात (जेडीयू) विलीन होणार हे अद्याप समजलेले नाही. मांझी हे त्यांच्या मुलाच्या साहाय्याने ‘जेडीयू’शी वाटाघाटी करतील, अशीही चर्चा आहे. लालूप्रसाद यादव यांचे व्याही चंद्रिका यादव, फराज फातमी व जयवर्धन यांनी आजच ‘जेडीयू’त प्रवेश केला आहे. ते तिघेही ‘आरजेडी’चे आमदार होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मुलाकडे सूत्रे
महाआघाडीतून बाहेर पडणार असल्याची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत जीतनराम मांझी शांत होते. पक्षाच्या निर्णयाची माहिती त्यांचा मुलगा संतोष मांझी यांनी दिली. संतोष हे सध्या ‘आरजेडी’चे विधान परिषदेत सदस्य आहेत. या वरून मांझी यांनी त्यांच्या मुलाला सक्रिय राजकारणात आणल्याचे मानले जात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindustani Awam Morcha Assembly elections in Bihar