
एचआयव्हीग्रस्त चालवताहेत ‘पॉझिटिव्ह कॅफे’
कोलकता : एड्ससारख्या आजाराकडे किंवा एचआयव्हीग्रस्तांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन कलंकित आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्यातील बालीगंज परिसरात सात एचआयव्हीग्रस्त किशोरवयीन ‘पॉझिटिव्ह कॅफे’ चालवत समाजाचा हा दृष्टिकोन बदलण्याबरोबरच एड्स, एचआयव्हीबद्दलचे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे, ग्राहकही या कॅफेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
डॉ. कल्लोल घोष यांनी २०१८ मध्ये जोधपूर पार्कमध्ये १०० चौरस फुटांच्या एका गॅरेजमध्ये सर्वप्रथम हा कॅफे सुरू केला डॉ. घोष एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी स्वयंसेवी संस्था चालवतात. ते या कॅफेबद्दल बोलताना म्हणाले, की आमच्या ग्राहकांना एचआयव्हीग्रस्तांच्या कॅफेत कॉफीचा किंवा सॅंडविचचा आस्वाद घेण्यात कोणतीही अडचण नसते. फारच थोडे ग्राहक अजूनही तसेच माघारी जातात. आम्ही प्रत्येक ग्राहकाला कॅफेविषयी सविस्तर माहिती पुरविणारी पत्रके देतो. विशीतील तरुण ग्रहणक्षम व प्रगतिशील असून एचआयव्हीबद्दल लवकर समजून घेतात. एचआयव्ही संसर्गजन्य आजार नाही, हे समजून घ्यायला हवे असेही त्यांनी नमूद केले.
कॅफे सुरु करण्याच्या संघर्षाबद्दल बोलताना ते म्हणाले, की कॅफेसाठी जागा मिळणे कठीण होते. समजून सांगितल्यानंतर एका इमारतीचा मालक त्याचे गॅरेज कॅफेसाठी भाड्याने देण्यास तयार झाला. मात्र, गॅरेजमधील कॅफेतील कचऱ्यातून आसपासच्या परिसरात एड्स पसरू शकतो, असा आरोप करत काही शेजाऱ्यांनी विरोध केला. हा दक्षिण कोलकत्यातील उच्चभ्रू परिसर होता, हे विशेष. कॅफे सुरू करण्याची ही लढाई कठीण होती. मात्र, तो सुरू झाल्यावर याच कोलकत्यातील ग्राहकांनी कॅफेला प्रतिसाद दिला.
एचआयव्हीग्रस्तांचा आशियातील पहिला कॅफे
ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नुकतेच या कॅफेने बालीगंजमधील मोठ्या जागेत स्थलांतर केले. कॅफेमध्ये कॉफीपासून चिप्स, सॅंडवीच तयार करून ते ग्राहकांना देण्यापर्यंतची सर्व कामे सात एचआयव्हीग्रस्त करतात. एचआयव्हीग्रस्तांकडून चालविला जाणारा हा केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिला कॅफे असल्याचा डॉ. घोष यांचा दावा आहे.
आम्ही इतरांपेक्षा वेगळे नाही. आम्हाला परक्यांप्रमाणे वागणूक दिली जाऊ नये. गायक सिद्धार्थ रे यांनीकॅफेला भेट देत प्रोत्साहित केले. कॅफेचा स्वीकार केल्याबद्दल कोलकत्याचे आभार.
-कॅफे चालवणारा किशोरवयीन
Web Title: Hiv Positive People Run Positive Cafes Kolkata
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..