नेटफ्लिक्स, अॅमेझॉनला मागे टाकत 'ही' कंपनी व्यायवसायात बनली नंबर वन

वृत्तसंस्था
Wednesday, 28 August 2019

 हॉटस्टारने भारतात नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडिओला मागे टाकत भारतातील ओव्हर द टॉप (ओटीटी) व्यवसायात नंबर वन क्रमांक पटकावला आहे.

पुणे : हॉटस्टारने भारतात नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडिओला मागे टाकत भारतातील ओव्हर द टॉप (ओटीटी) व्यवसायात नंबर वन क्रमांक पटकावला आहे.

नेटफ्लिक्स इंटरनेट मनोरंजन सेवेत जगात जरी नंबर वन असले तरी भारतात मात्र वॉल्ट डिस्ने कंपनीच्या हॉटस्टारचीच चलती आहे. देशात हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ यांच्यात जबरदस्त चुरस आहे. मात्र अलीकडेच मोमॅजिक या अॅपचे वितरण करणाऱ्या कंपनीकडून केलेल्या एका सर्व्हेमधून हॉटस्टारच भारतात सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाहणीमध्ये 41 टक्के नागरिकांनी हॉटस्टारला पसंती दाखवली तर अॅमेझॉन प्राईम व्हिडिओला 26 टक्के आणि नेटफ्लिक्सला 9 टक्केच नागरिकांनी पसंती दाखवली आहे.

हॉटस्टारचे तब्बल 30 कोटी ग्राहक आहेत. तर अॅमेझॉनचे 1.3 कोटी आणि नेटफ्लिक्सचे 1.1 कोटी ग्राहक आहेत. त्याचबरोबर या तीनही मुख्य ब्रॅंडचे स्पर्धक असलेले वूट, झी5, अॅरे आणि लोनीलाईव्ह यांचीही लोकप्रियता वेगाने वाढते आहे. या पाहणी अहवालानुसार 55 टक्के नागरिकांना या ओटीटी सेवेतून व्हिडिओ पाहायला आवडते. तर 85 टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी मागील सहा महिन्यात एका तरी ओटीटी सेवेचा वापर केल्याचे सांगितले.

ओटीटी सेवा ग्राहकांच्या सोयीची, मागणीनुसार व्हिडिओ पुरवणारी आणि माफक दरातील असल्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. भारतातील स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे ओटीटी ब्रॅंडसाठी भारत ही एक चुरशीची बाजारपेठ बनली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hotstar beats Netflix, Amazon Prime Video to become top OTT platform in India