आंध्रातील विवाह रॅकेटमागे 'मजलिस': भाजप नेते एन. रामचंद्रराव

आंध्रातील विवाह रॅकेटमागे 'मजलिस': भाजप नेते एन. रामचंद्रराव

हैदराबाद : येथे अल्पवयीन मुलींचे श्रीमंत अरबांशी विवाह लावून देणारे एक मोठे रॅकेट उघडकीस आल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. भाजपचे आमदार एन. रामचंद्रराव यांनी या रॅकेटमागे "ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन' या संघटनेच्या ओवेसी बंधूंचा हात असल्याचा गंभीर आरोप करत या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच ओमानी, तीन कतारमधील शेख, तीन काझी, चार लॉजमालक आणि पाच ब्रोकर्संना अटक केली आहे. हैदराबादेतील या रॅकेटची व्याप्ती मुंबईपर्यंत पोचली असून, यामध्ये सहभागी असलेले अन्य 35 ब्रोकर्स पोलिसांनी शोधून काढले, आखाती देशांमधील नागरिकांचाही यामध्ये समावेश आहे.

तपास पथकाची कारवाई
सतरा ऑगस्ट रोजी हैदराबादेत बालविवाह झाल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत एका तपास पथकाची स्थापना केली होती. या पथकाने शहरामध्ये अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. यातून धक्कादायक माहिती उघड झाली होती. काही श्रीमंत अरबांना विमानतळावरून हॉटेलामध्ये आणण्यापर्यंत आणि त्यानंतर हॉटेलांत त्यांचे विवाह लावून पाठवणी करण्याचे काम करणारी मोठी यंत्रणा कार्यरत असल्याचे उघड झाले होते.

गरीब मुली लक्ष्य
काही दलाल हे गरीब मुलींना पैशांचे आमिष दाखवून पळवून नेतात आणि त्यानंतर धर्मगुरूंच्या मध्यस्थीने विवाहाच्या नावाखाली त्यांची अरबांना विक्री केली जाते. अरबांशी विवाह लावताना या मुलींच्या कोऱ्या मुद्रांकावर स्वाक्षऱ्या घेतल्या जातात; तसेच त्यांना तोंडी तलाकची प्रथाही मान्य करणे बंधनकारक असते. विवाहानंतर या मुलींना आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधता येतो. या साखळीतील काही ब्रोकर्स हे गरीब कुटुंबांवर लक्षच ठेवून असतात.

महिलांचाही समावेश
एकदा अरब देशांमध्ये विक्री झाल्यानंतर संबंधित पीडित अल्पवयीन मुलगी अनेकांच्या शोषणाला बळी पडते. या रॅकेटमध्ये 25 महिलांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. मागणीप्रमाणे मुलींचा पुरवठा करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले जाते. काही हॉटेलांमध्ये तर या मुलींचे प्रदर्शनच भरविले जाते. बऱ्याचदा ही अरब मंडळी संबंधित मुलीच्या घरास भेट देऊनही त्यांची निवड करतात. या प्रक्रियेमध्येही मुलींचे लैंगिक शोषण होते.

पोलिसांची मागणी
बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी अल्पसंख्याक कल्याण विभागाने परकी नागरिकांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, अशी मागणी शहर पोलिसांनी केली आहे. परकी नागरिकांनी भारतात येताना त्या देशाकडून ना-हरकत प्रमाणपत्र आणावे; तसेच विवाहाप्रसंगी पती आणि पत्नीमधील वयाचे अंतर हे दहा वर्षांपेक्षा अधिक असता कामा नये, परकी नागरिकांनी येथील मुलींशी विवाह करताना हे ना-हरकत प्रमाणपत्र पोलिसांना सादर करावे, अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com