
शरद पवारांचा मी आदर करतो यापुढेही करत राहीन - बृजभूषण सिंह
नवी दिल्ली : अयोध्या दौरा रद्द झाल्यावरुन राज ठाकरे यांनी आपल्याविरोधात जाळं विणलं जात असल्याचा आरोप पुण्यातील सभेत केला होता. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना रोखणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह आणि शरद पवार यांचा एका कार्यक्रमातला फोटो ट्विट केला होता. यावरुन राज ठाकरेंच्या दौऱ्याला शरद पवारांनीच खोडा घातल्याचं त्यांनी सूचकपणे म्हटलं होतं. या फोटोवर आता बृजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांचा मी आदर करतो आणि यापुढेही करत राहीन असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच ट्रॅप राज ठाकरेंसाठी नव्हे तर ते स्वतःसाठी ट्रॅप लावत होते, त्यांची नौटंकी फ्लॉप झाली आहे, अशा शब्दांत त्यांनी टोलाही लगावला. (I respect Sharad Pawar and will continue to do so says MP Brijbhushan Singh)
बृजभूषण सिंह म्हणाले, राज ठाकरे स्वतः मैदान सोडून पळाले आहेत. त्यामुळं आता त्यांचे कार्यकर्ते आरोप लावत आहेत की त्यांना जाळ्यात अडकवलं जात आहे. त्यांच्यासोबत षडयंत्र केलं जात आहे. ट्रॅप राज ठाकरेंसाठी नव्हे तर ते स्वतःसाठी ट्रॅप लावत होते, राज ठाकरेंची नौटंकी फ्लॉप झाली आहे.
"मी भारतीय कुस्ती संघाचा अध्यक्ष आहे आणि तीन वर्षांपूर्वी मी एका कार्यक्रमाला गेलो होते तिथं शरद पवार आले होते. त्यांचं मोठेपण आहे की त्यांनी तीन दिवस त्या कार्यक्रमला हजेरी लावली आणि तिन्ही दिवस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पवारांसाठी आणलेले हार शरद पवार माझ्या गळ्यात घालत होते. शरद पवार हे मोठे व्यक्ती आहेत मी त्यांचा आदर करतो. लाखो लोक समोर असले तरीही मी त्यांचा आदर करेन. मला वाटतं राज ठाकरे स्वतः एका भ्रमात जगत होते आणि आता त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. मी शरद पवारांचा सन्मान करतो आणि पुढेही करत राहिन," असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंना मी वैयक्तीक पातळीवर विरोध केला होता, मी त्यांना रोखण्यात सक्षमही आहे. त्यांचा ड्रामा यशस्वी झाला नाही. त्यामुळं आता त्यांनी पुन्हा आपले खरे रंग दाखवले आहेत. त्यांना कोणीही ट्रॅप करत नव्हतं तेच स्वतः लोकांना ट्रॅप करत होते. कारण राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा मुद्दा समोर आला तेव्हा मनसेच्या काही कार्यकर्त्यांचे मला फोन आले की, तुमचं CM योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत बोलणं झालं का? असं बोलून ते माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. पण मी त्यांना म्हटलं की, तुम्हीच माझं त्यांच्यासोबत बोलण करुन द्या, असंही बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं आहे.
Web Title: I Respect Sharad Pawar And Will Continue To Do So Says Mp Brijbhushan Singh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..