मुख्यमंत्रीच भाजप नेत्याला म्हणतात, 'तुझी मान कापून टाकेन' (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

भाजपकडून जनआशीर्वाद यात्रा काढली जात आहे. या यात्रेदरम्यानचा आता व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर वादात सापडले आहेत.

चंदिगड : भाजपकडून जनआशीर्वाद यात्रा काढली जात आहे. या यात्रेदरम्यानचा आता व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर वादात सापडले आहेत. खट्टर आपल्याच पक्षातील नेत्याला धमकी देत आहेत. या यात्रेदरम्यान भाजप नेत्याने टोपी घालण्याचा प्रयत्न करताच खट्टर हे काय करत आहात? तुझी मान कापून टाकेन, अशी धमकीच दिली.

खट्टर यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ जनआशीर्वाद यात्रेतील आहे. या व्हिडिओमध्ये खट्टर एका वाहनावर उभे राहिल्याचे दिसत आहेत. त्यांच्या हातात एक कुऱ्हाड आहे. कुऱ्हाड हातात घेतल्यानंतर खट्टर म्हणाले, की शत्रूचा नाश करण्यासाठी कुऱ्हाड असते. याचवेळी खट्टर यांच्यामागे असलेल्या एका भाजप नेत्याकडून खट्टर यांना पारंपारिक टोपी घालण्याचा प्रयत्न केला जाताना दिसत आहे. मात्र, खट्टर यांना हे आवडले नसल्याने त्यांचा पारा चढला. त्यांनी आपल्याच पक्षातील नेत्याला मान कापण्याची धमकी दिली.  

खट्टर यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी खट्टर यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, खट्टर साहेबांना राग का येतो? कुऱ्हाड घेऊन त्यांच्याच नेत्याला म्हणतात, मान कापून टाकेन. मग जनतेसोबत काय करतील? अशा शब्दांमध्ये सुरजेवाला यांनी खट्टर यांच्यावर टीकास्त्र सोडले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: i will chop your neck says haryana cm manohar lal khattar