ड्रोनविरोधी यंत्रणा विकसित करण्याचा विचार 

पीटीआय
Monday, 30 September 2019

भारतात सुमारे सहा लाख अनियंत्रित ड्रोन असून, त्यांच्यापासून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासून सुरक्षेसाठी "स्काय फेन्स' आणि "ड्रोन गन'प्रमाणे अत्याधुनिक ड्रोनविरोधी यंत्रणा उभारण्याबाबत सुरक्षा यंत्रणा चाचपणी करत असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 

नवी दिल्ली (पीटीआय) : भारतात सुमारे सहा लाख अनियंत्रित ड्रोन असून, त्यांच्यापासून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासून सुरक्षेसाठी "स्काय फेन्स' आणि "ड्रोन गन'प्रमाणे अत्याधुनिक ड्रोनविरोधी यंत्रणा उभारण्याबाबत सुरक्षा यंत्रणा चाचपणी करत असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 

सुरक्षा संस्थांनी तयार केलेल्या आराखड्याची माहिती "पीटीआय'ला मिळाली असून, त्यामध्ये अनियंत्रित ड्रोन, रिमोटद्वारे नियंत्रित विमाने ही देशातील सुरक्षा व्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. या धोक्‍यापासून बचाव करण्यासाठी सक्षम यंत्रणा आवश्‍यक असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. देशातील सुरक्षा संस्थांनी जमा केलेल्या माहितीनुसार, देशभरात विविध आकारांचे आणि क्षमतेचे सहा लाखांहून अधिक अनियंत्रित ड्रोन आहेत. यांचा वापर हल्ल्यासाठी होऊ शकतो.

सौदी अरेबियात तेल कंपनीवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भारतातही सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या आहेत. असे अनियंत्रित ड्रोन पाडण्यासाठी किंवा पकडण्यासाठी स्काय फेन्स, ड्रोन गन, ड्रोन कॅचर, स्काय वॉल यासारखी यंत्रणा विकसित करणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्‍यक आहे. आयपीएस अधिकारी पंकजकुमार सिंह यांनी प्रसिद्ध केलेल्या "ड्रोन : पोलिसांसमोरील नवे आव्हान' या अहवालात त्यांनी ड्रोनपासून असलेल्या धोक्‍याबाबत सावध केले आहे. 

ड्रोनविरोधी यंत्रणा 
ड्रोन गन : या गनद्वारे ड्रोन आणि त्याचे नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्तीमधील मोबाईल सिग्नल, जीपीएस आणि रेडिओ सिग्नल जॅम करता येतो. यामुळे ड्रोनद्वारे घातपात घडविण्याआधीच ते जमिनीवर पाडता येते. ऑस्ट्रेलियाने तयार केलेल्या ड्रोन गनची रेंज दोन किलोमीटरपर्यंत असते. 

स्काय फेन्स : ड्रोनचा संपर्क भेदण्यासाठी ही यंत्रणा विविध सिग्नल पाठवते आणि ड्रोनला त्याच्या लक्ष्यावर हल्ला करण्यापासून रोखते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The idea of ​​developing an anti-drone mechanism