...त्याने ट्रॅफिक सिग्नल तोडला नसता तर, चिदंबरम ईडीच्या जाळ्यात फसले नसते

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

- वाहनचालकाने सिग्नल तोडला अन्‌ चिदंबरम तुरुंगात गेले
- इंद्राणी मुखर्जींच्या चालकाची एक चूक ठरली गेमचेंजर

मुंबई : वाहनचालकाच्या एका क्षुल्लक चुकीमुळे देशातील सर्वांत मोठ्या गैरव्यवहाराचा भंडाफोड झाला अन्‌ आज त्याचमुळे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तुरुंगाची हवा खावी लागत आहे.

एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल अशी ही कथा. यानंतर एका मागोमाग अनेक पडदे उघडत गेले आणि वेगवेगळ्या घटना समोर येत गेल्या. तसे पाहता त्याने सिग्नल तोडला नसता, तर चिदंबरम हे "ईडी'च्या जाळ्यात फसलेही नसते. 

तो प्रसंग मुंबईतला. एका वाहनचालकाने कार्टर रोडवर वाहतूक सिग्नल तोडल्यानंतर कर्तव्यदक्ष मुंबई वाहतूक पोलिसांनी त्याला पकडले, तेव्हा त्याच्याजवळ धारदार चाकू सापडला. 

अटकेपासून स्वत:ला वाचविण्याच्या नादात त्याच्या तोंडातून इंद्राणी मुखर्जी यांचे नाव निघाले. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर त्यानेच इंद्राणी यांनी त्यांच्या भाचीची हत्या केली असल्याचे सांगितले. पुढे मात्र पोलिस या प्रकरणाच्या आणखी मुळाशी गेले असता हत्या झालेली शीना बोरा इंद्राणी यांची मुलगी असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांच्या सखोल चौकशीत इंद्राणी आणि त्यांची मुलगी शीना बोराच्या जॉइंट अकाउंटची माहिती मिळते. त्यात इंद्राणी यांनी मुलीच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर केलेले असतात. ते पैसे मुलगी परत करायला नकार देते. त्यामुळे इंद्राणी शीना बोराची हत्या करतात. इंद्राणी यानंतर त्या मुलीच्या अकाउंटवर पाठविलेले पैसे ब्रिटनला पाठविण्याचा प्रयत्न करतात. पुढे हीच लिंक पनामा अकाउंटला मिळते आणि आणखीनच नवी माहिती समोर येते. 

सरकारी साक्षीदार 
शीना बोरा खून प्रकरणात इंद्राणी तुरुंगात जातातात. तिथे सरकारी साक्षीदार बनतात. कॉंग्रेस, चिदंबरम, एनडी टीव्हीचा मालक, काळा पैसा, पती पीटर मुखर्जीच्या आयएनएक्‍स मीडियाच्या माध्यमातून पनामा अकाउंटवर जमा केलेले पैसे आणि लाच दिलेल्या संपूर्ण प्रकरणाचा भंडाफोड करतात. त्या वेळी चिदंबरम यांचा मुलगा कार्तीच्या अकाउंटवर देश-परदेशातील स्वयंसेवी संस्था आणि भारतातील काही उद्योगपतींकडून जमा झालेल्या पैशाचा स्रोत मिळतो अन्‌ चिदंबरम पिता-पुत्र जेलमध्ये जातात. फक्त एका वाहनचालकाने सिग्नल तोडल्याच्या किरकोळ घटनेमुळे आज देशाचा माजी अर्थमंत्री तुरुंगाची हवा खातो आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: if Driver would not break the traffic signal then chidambaram not to fall in ED inquiry