बेळगावात तयार केलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना वाढती मागणी

मिलिंद देसाई
रविवार, 12 मे 2019

एक नजर

  • शिवाजी महाराज यांचे पुतळे तयार करणारे शहर अशी बेळगावची नवी ओळख.
  • गोवा, बीड, हावेरीसह उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून पुतळ्यांना मागणी
  • विविध भागात बसविण्यात येणाऱ्या 100 हुन अधिक पुतळ्याची आगाऊ नोंदणी
  • गेल्या 15 दिवसात पाठवले 50 हून अधिक पुतळे
  • शहरात सुमारे 100 हून अधिक मूर्तीकारापैकी 25 मूर्तीकार तयार करतात शिवाजी महाराजांचे पुतळे 

बेळगाव -  शिवाजी महाराज यांचे पुतळे तयार करणारे शहर अशी बेळगावची नवी ओळख झाली आहे. गेल्या 15 दिवसात बेळगाव शहरातील मूर्तिकारांनी शिवाजी राजांचे 50 हुन अधिक पुतळे तयार केले आहेत. हे सर्व पुतळे गोवा, बीड, हावेरीसह उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विविध भागात पाठविण्यात आले आहेत.

विविध भागात बसविण्यात येणाऱ्या 100 हुन अधिक पुतळ्याची आगाऊ नोंदणी शहरातील मूर्तिकारांकडे केली आहे. त्यामुळे दरवर्षी 100 ते 125 पुतळे विविध भागात पाठविले जात आहेत.

यापूर्वी पुतळ्यांसाठी कोल्हापूर, सांगली आदी भागातील मूर्तिकारांवर शिवप्रेमींना अवलंबून रहावे लागत होते.  परंतु बेळगाव शहरातील मूर्तीकार सुबक आणि मंडळांना आवश्यक असलेला पुतळा तयार करून देत आहेत.  त्यामुळेच उत्तर कर्नाटक, कोकण, कोल्हापूर, सांगली व महाराष्ट्राच्या इतर भागातून पुतळ्यासाठी मागणी वाढू लागली आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून विविध गावांमध्ये शिव पुतळ्याची प्रतिष्ठापणा करण्यात येते. नुकतीच पारंपारिक शिवजयंती झाली यामुळे गेल्या 15 दिवसात मोठ्या प्रमाणात पुतळे बेळगाव शहरातून पाठविण्यात आले.

ब्राँझपेक्षा फायबरच्या पुतळ्याना अधिक मागणी असून चांगल्या प्रतीचे सुंदर पुतळे मूर्तिकार तयार करून देत आहेत. त्यामुळेच  मागणी वाढली आहे. शहरात सुमारे 100 हून अधिक मूर्तीकार आहेत. यापैकी 25 मूर्तीकार हे शिवाजी महाराज यांचे पुतळे तयार करतात. मुख्यतः विक्रम पाटील, विनायक पाटील, संजय किल्लेकर या मूर्तीकारांकडे सर्वाधिक मागणी आहे.             

काही महिन्यांपूर्वी काही मडळांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मागणी नोंदविली होती. गेल्या 15 दिवसात मोठे आठ तर लहान सात पुतळे तयार करून दिले आहेत. गेल्या काही वर्षात शिवपुतळे बसविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोंद होत आहे यामध्ये फायबरच्या पुतळ्यांची संख्या अधिक आहे.

- विक्रम पाटील, मूर्तिकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increasing demand for Shivaji Maharaj statues built in Belgaum