स्वातंत्र्यानंतर प्रथमच संसदीय अधिवेशन अत्यंत वेगळ्या स्वरूपात

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 16 August 2020

संसदेचे पावसाळी अधिवेशन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याचे संकेत आहेत.

नवी दिल्ली- संसदेचे पावसाळी अधिवेशन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याचे संकेत आहेत. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत कोरोना-साथीची बाब लक्षात घेऊन कामकाजाची तयारी पूर्ण करण्याच्या सूचना दोन्ही सभागृहांच्या मुख्य पीठासीन अधिकाऱ्यांनी आपापल्या सचिवालयांना केल्या आहेत. कामकाजासाठी दोन्ही सभागृहांचा, त्यामधील प्रेक्षक आणि इतर कक्षांचा उपयोग करण्याबाबतची तयारी केली जात आहे. दोन्ही सभागृहांमध्ये भव्य ८०- इंची टीव्ही तसेच प्रेक्षक कक्षांमध्ये बसणाऱ्या सदस्यांसाठी त्याहून लहान आकाराचे टीव्ही पडदे लावण्यात येत आहेत. शारीरिक दूरीची बाब ध्यानात घेऊन दोन सदस्यांच्या मध्ये पॉलिकार्बोनेटचे पारदर्शक पडदेही लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर विषाणू व जीवाणूनाशक यंत्रणांमध्ये अल्ट्राव्हायोलेट किरणांचा वापर करण्यात येणार आहे.

"पंतप्रधान मोदी यांचं लॉकडाऊनचं नियोजन चुकलंच"

स्वातंत्र्यानंतर प्रथमच संसदीय अधिवेशन हे अत्यंत वेगळ्या स्वरूपात आयोजित केले जाणार आहे. अधिवेशनाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते सुरू होईल असे समजते. त्याचप्रमाणे बहुधा पावसाळी व हिवाळी अधिवेशन एकत्रित होण्याची दाट शक्यताही व्यक्त होत आहे. त्यासाठी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत संसद सभागृह हे या नव्या स्थितीत अधिवेशनासाठी सुसज्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू आणि लोकसभाचे सभापती बिर्ला हे यात बारकाईने लक्ष घालत आहेत. 
शारीरिक दूरीकरणाच्या मापदंडामुळे अधिवेशनासाठी नेहमीपेक्षा जागा अधिक लागणार आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहांना परस्परांची जागा वापरावी लागणार आहे. त्यामुळे बहुधा एक दिवसाआड सभागृहांचे कामकाज चालण्याची शक्यता आहे. म्हणजे एक दिवस लोकसभा तर दुसऱ्या दिवशी राज्यसभा अशा क्रमाने कामकाज चालविले जाणे अपेक्षित आहे. 

coronavirus updates: देशात सलग 8 दिवस आढळले 60 हजारांपेक्षा अधिक रुग्ण! 

राज्यसभेने केलेल्या तयारीनुसार कामकाजासाठी मूळ सभागृहात ६० सदस्यांच्या बसण्याची सोय केली जाईल, तर ५१ सदस्यांची सोय वर असलेल्या विविध प्रेक्षाकक्षात केली जाईल. उर्वरित १३२ सदस्यांची सोय लोकसभेच्या सभागृहात केली जाईल. या सर्व सदस्यांना परस्परांना पाहण्यासाठी दोन्ही सभागृहांहाध्ये ८५ बाय ४० इंच आकाराचे स्क्रीन लावण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सदस्यांना प्रश्‍न विचारण्यासाठी व त्यासाठी पीठासीन अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी फलक देण्यात येणार आहेत. या सर्व प्रक्षेपणात प्रकाश व्यवस्था हा सर्वात मुख्य घटक असल्याने सर्वत्र झगझगीत प्रकाशव्यवस्था करण्यात आली आहे.

कँटिनसेवा तात्पुरती बंद

सेंट्रल हॉलमध्ये केवळ संसद सदस्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. संसदगृहातील रेल्वेतर्फे चालविली जाणारी कँटीन सेवा बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी सदस्यांच्या आहार किंवा अल्पोपहराची पर्यायी व्यवस्था काय करण्यात आली आहे. याची माहिती देण्यात आलेली नाही. सध्या केवळ चहा, कॉफी, टोस्ट किंवा लस्सी, ताक असेच पदार्थ उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: since independence the parliamentary session will be taken a very different form