अपक्ष राज्यसभा सदस्यांचा कोविंद यांना पाठिंबा शक्‍य

पीटीआय
मंगळवार, 4 जुलै 2017

आगामी राष्ट्रपतिपदी कोविंद यांची निवड निश्‍चित मानले जात आहे. मात्र, मताधिक्‍य पक्के करण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून रात्रंदिवस प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अपक्ष सदस्यांबरोबरच छोट्या पक्षांचे सदस्य व नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत

नवी दिल्ली - राज्यसभेचे सर्व सहा अपक्ष सदस्य राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए)चे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान करण्याची शक्‍यता आहे. एकूण मतदानाच्या दोन तृतीयांश मतांसाठी भारतीय जनता पक्षाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना त्यामुळे बळ मिळाले आहे.

भाजपच्या बहुतेक निर्णयांना जे अपक्ष राज्यसभा सदस्य पाठिंबा देत आहेत त्यांच्यामुळे अन्य सदस्यही कोविंद यांना मतदानासाठीच्या आवाहनाला प्रतिसाद देतील, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. आघाडी सरकारचाच भाग असलेले केरळचे राजीव चंद्रशेखर, महाराष्ट्राचे बांधकाम व्यावसायिक संजय काकडे, झी समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्रा हे भाजपच्या पाठिंब्यावरच राज्यसभेवर निवडून आले आहेत. उद्योजक परिमल नथवानी, समाजवादी पक्षातून हकालपट्टी केलेले अमरसिंग आणि ओडिशाचे ए. व्ही. स्वामी यांची अपक्ष सदस्य गणना होते. या सर्व सदस्यांशी आम्ही संपर्क साधला असून, ते कोविंद यांना मतदान करतील अशी अपेक्षा आहे, असे भाजपच्या नेत्याने सांगितले.

आगामी राष्ट्रपतिपदी कोविंद यांची निवड निश्‍चित मानले जात आहे. मात्र, मताधिक्‍य पक्के करण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून रात्रंदिवस प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अपक्ष सदस्यांबरोबरच छोट्या पक्षांचे सदस्य व नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत.

कोविंद हे वेगवेगळ्या राज्यांच्या दौऱ्यावर असून, उद्या (ता. 4) ते तेलंगण आणि आंध्र प्रदेशमध्ये, तर परवा (ता. 5) कर्नाटकात असतील. ते सहा जुलैला अरुणाचल प्रदेशमध्ये आणि नंतर नागालॅंड, मणिपूर येथे जाणार आहेत, तर आठ जुलैला मध्य प्रदेशात जाणार आहेत, असे सांगण्यात आले. या दौऱ्यात ते स्थानिक खासदार आणि आमदारांच्या भेटीगाठी घेणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Independents to vote for Kovind?