Heron Mark 2 : हवाई दलाला ‘हेरॉन मार्क २’चे बळ; उत्तर सीमेवर अत्याधुनिक ड्रोन तैनात; हल्ला करण्याचीही क्षमता

भारतीय हवाई दलाने देशाच्या उत्तर सीमेवर ‘हेरॉन मार्क २’ हे अत्याधुनिक ड्रोन तैनात केले
Heron Mark 2
Heron Mark 2 sakal

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने देशाच्या उत्तर सीमेवर ‘हेरॉन मार्क २’ हे अत्याधुनिक ड्रोन तैनात केले आहेत. सीमेवर देखरेख ठेवण्याबरोबरच हवाई कारवाई करण्याचीही या ड्रोनची क्षमता आहे. या ड्रोनमुळे चीन आणि पाकिस्तानबरोबरील सीमारेषेवर गस्त घालण्याच्या भारताच्या क्षमतेत मोठी वाढ झाली आहे.

देशाच्या उत्तर सीमेवरील हवाई तळांवर चार नवे ‘हेरॉन मार्क २’ ड्रोन सज्ज ठेवण्यात आले आहेत. इस्राईली बनावटीच्या या ड्रोनवर दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रे तैनात करण्यात आली आहेत. हे ड्रोन उपग्रहांशीही संपर्क साधू शकतात.

यामुळे भारतीय हवाई दलाला लांब अंतरावरूनही ड्रोनवर नियंत्रण आणि ड्रोनद्वारे सीमेवर देखरेख ठेवता येणे शक्य होणार आहे. हे ड्रोन ३६ तासांपर्यंत हवेत राहू शकतात तसेच, दीर्घ अंतरावर असलेल्या लक्ष्यावर लेझर किरणांचा मारा करून त्यांचे ठिकाण उघड करू शकतात.

हे ठिकाण उघड होताच हवाई दलाची लढाऊ विमाने क्षेपणास्त्रांच्या साह्याने लक्ष्यभेद करू शकतात. हे ड्रोन नजरेला पडणार नाहीत, इतक्या उंचीवरून उडू शकत असल्याने नियंत्रण कक्षातून संपूर्ण देशावरही देखरेख ठेवता येईल, असे विंग कमांडर पंकर राणा यांनी सांगितले. हे ड्रोन सर्व प्रकारच्या वातावरणात काम करण्यास सक्षम असून कोणत्याही प्रकारच्या भूप्रदेशावरील लक्ष्याचा माग काढण्याची त्याची क्षमता आहे, असेही त्यांनी सांगितले.

स्वतंत्रपणे कारवाई करण्याचीही ‘हेरॉन मार्क २’ची क्षमता असून त्यासाठी त्याला क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रांनी सुसज्ज करण्याचे काम सुरु आहे.

‘प्रोजेक्ट चित्ता’वर काम सुरु

भारतीय हवाई दलाच्या ‘प्रोजेक्ट चित्ता’अंतर्गत हवाई दलाकडील ७० हेरॉन ड्रोनला अद्ययावत केले जात आहे. या ड्रोनना उपग्रहांशी जोडले जात असून त्यांना शस्त्रास्त्रांनीही सुसज्ज केले जात आहे. याशिवाय, संरक्षण दलाला ३१ ‘प्रिडेटर ड्रोन’ही मिळणार आहेत. अत्यंत उंचीवरून दीर्घकाळ कार्यक्षम राहू शकणाऱ्या या ड्रोनमुळे समुद्रावर गस्त घालणे भारतीय नौदलाला अधिक सोपे जाणार आहे. या ३१ ड्रोनपैकी १५ ड्रोन नौदलाला मिळणार असून हवाई दल आणि लष्कराला प्रत्येकी आठ ड्रोन मिळणार आहेत.

‘हेरॉन मार्क २’

नजरेला पडणार नाही इतक्या उंचीवरून देखरेख

सलग ३६ तास हवेत थांबण्याची क्षमता

क्षेपणास्त्र यंत्रणेने सज्ज

लक्ष्यावर २४ तास लक्ष ठेवणे शक्य

कोणत्याही वातावरणात उडण्याची क्षमता

वजन : १३५० किलो

उंची गाठण्याची क्षमता : ३५ हजार फूट

वेग : १५० नॉट्‌स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com