
WHO च्या कोरोना मृत्यूच्या आकडेवारीवर भारताचा आक्षेप, म्हणतात...
नवी दिल्ली : भारतात कोरोनामुळे ४७ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO Corona Death Toll) केला आहे. पण, भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा (India Corona Death Toll) एकूण अधिकृत आकडा 5.2 लाखांच्या जवळ आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेली संख्या ही भारतातील अधिकृत आकडेवारीपेक्षा १० पटीने जास्त आहे. पण, आता यावर भारत सरकारने आक्षेप नोंदवला आहे. आम्ही गप्प बसणार नाही, अशी सरकारची भूमिका असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं आहे.
हेही वाचा: जगात कोविडचे 1.5 कोटी बळी; सर्वाधिक संख्या भारतात
नोव्हेंबरपासून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या संदर्भात WHO ला 10 पत्रे लिहिली. पण WHO ने कोणालाच उत्तर दिले नाही. WHO ने कोरोना मृत्यूची ही आकडेवारी राज्यांच्या संकेतस्थळांवरून, आरटीआय आणि दूरध्वनी सर्वेक्षणाच्या हवाल्याने वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून घेण्यात आली आहे. आमच्याकडून अधिकृत आकडेवारी का घेण्यात आली नाही? असा सवाल भारत सरकारने उपस्थित केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मॉडेल, डेटा संकलन, डेटा स्रोत, प्रक्रिया (पद्धती) कोणती वापरली? यावर आमचा आक्षेप आहे. आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही सर्व अधिकृत माध्यमांचा वापर करून आणि कार्यकारी मंडळाकडे आमचा आक्षेप नोंदवू, असं सरकारचं म्हणणं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
जगभरातील सर्व देशांनी दिलेल्या आकडेवारीपेक्षा २०२०-२१ या वर्षात कोरोनामुळे १ कोटी ४९ लाख अधिक मृत्यू झाल्याचा दावाही डब्ल्यूएचओने गुरुवारी केला आहे. ते म्हणतात की 84 टक्के मृत्यू फक्त आग्नेय आशिया, युरोप आणि अमेरिकेत झाले आहेत. महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, हिमाचल, पंजाब, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आसाम, आंध्र प्रदेश, चंदीगड, बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यातील मृत्यूची आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. WHO चे म्हणणे आहे की, भारतातील 60 टक्के लोकसंख्या या राज्यांमध्ये आहे. आम्ही 2020 चा डेटा दिला आहे. 2021 चा डेटा येणार असेल तर आम्ही देऊ. आमचा डेटा भारताच्या रजिस्ट्रार जनरलकडून जन्म आणि मृत्यू नोंदणी कायद्यांतर्गत येतो. यावर केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, 17 राज्यांच्या आधारे आकडेवारी जाहीर केली, मग 17 राज्यांची निवड कशाच्या आधारे करण्यात आली? असा सवाल केंद्राने उपस्थित केला आहे.
Web Title: India Objection On Who Corona Death Data
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..