
ठरलं! रशियाची बहुचर्चित स्पुटनिक लस 'या' दिवशी होणार भारतात दाखल
नवी दिल्ली : कोरोना विषाणूविरोधात अधिक प्रभावशाली ठरलेली रशियाची बहुचर्चित स्पुटनिक-व्ही लस भारतात लवकरच दाखल होणार आहे. १ मे रोजी या लसीची पहिली खेप भारतात दाखल होईल, अशी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे (RDIF) प्रमुख किरील दमित्रिव यांनी दिली. मात्र, अद्याप या पहिल्या खेपेत किती लसींचे डोस असतील हे स्पष्ट झालेलं नाही. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिलं आहे. दरम्यान, १ मे पासूनच भारतात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला प्रारंभ होणार आहे.
दमित्रीव म्हणाले, "स्पुटनिक व्ही ची पहिली खेप भारताला १ मे रोजी पाठवण्यात येईल. यामुळे भारताला कोरोना महामारीवर मात करण्यात मदत मिळेल." RDIF सध्या जगभरात स्पुटनिक व्ही लसीची मार्केटिंग करत आहे. दरम्यान, RDIFने पाच बड्या भारतीय लस उत्पादक कंपन्यांसोबत वार्षिक ८५ कोटींहून अधिक लसीचे डोस तयार करण्याचा करार केला आहे. त्याचबरोबर भारतात लवकरच या लसीचं उत्पादनही सुरु होऊ शकतं, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
याशिवाय रशियन फार्मा कंपनी फर्मासिंटेजने सोमवारी म्हटलं होतं की, "रशियन सरकारची मंजुरी मिळताच कंपनी मे महिन्याच्या शेवटापर्यंत भारताला रेमडेसिव्हीर अँटिव्हायरल औषधाचे एक मिलियन डोस पाठवण्यास तयार आहे. त्याचबरोबर मेस्किकोच्या सरकारने स्पुटनिक व्ही बाबत एक महत्वाची पुष्टी केली आहे, ती म्हणजे त्यांच्या देशात वापल्या गेलेल्या सर्व लसींमध्ये स्पुटनिक व्ही ही सर्वात सुरक्षित लस आहे.
दरम्यान, भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. मोठ्या प्रामाणावर रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल होत असल्याने बेड, ऑक्सिजन तसेच इतर वैद्यकीय उपकरणांची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत आहे. यामध्ये ब्रिटन, अमेरिकेसह अनेक देशांकडून मदत पाठवली जात आहे.
Web Title: India To Receive First Batch Of Russia Covid 19 Vaccine On May 1 Says
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..