
उष्ण तापमानातही टिकणार भारतीय लस!
नवी दिल्ली : कोरोनावर प्रभावी ठरू शकणाऱ्या भारतीय लशीची उंदरांवरील चाचणी यशस्वी झाली आहे. विशेष म्हणजे या लशीच्या साठवणुकीसाठी थंड हवामानाची गरज नाही. प्रतिपिंडे तयार करण्याची क्षमता असल्याने डेल्टा, ओमिक्रॉन तसेच कोरोनाच्या इतर प्रकारांवर ही लस प्रभावी ठरू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे. बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) आणि जैवतंत्रज्ञान कंपनी मायनव्हॅक्स यांनी करोना विषाणूच्या काटेरी कवचाच्या ‘रिसेप्टर बाईंडिग डोमेन’ (आरबीडी) या प्रथिनांच्या काही भागाचा या लशीसाठी उपयोग केला आहे. या प्रथिनांमुळे विषाणूला शरीरातील पेशींमध्ये शिरकाव करता येतो. या लशीच्या चाचण्या अजून सुरू आहेत.
लशीची चाचणी करणाऱ्या पथकात ऑस्ट्रेलियाच्या कॉमनवेल्थ सायंटिफिक अॅंड इंडस्ट्रिअल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या संशोधकांचा समावेश आहे. ही लस ३७ अंश सेल्सिअस तापमानात चार आठवडे टिकू शकते. इतकेच नव्हे तर १० अंश सेल्सिअस तापमानातही ही लस ९० मिनिटे टिकू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे. ऑक्सफर्डने तयार केलेल्या अॅस्ट्राझेनेका, भारतातील कोविशिल्ड या लशींना दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानात ठेवावे लागते. फायझरच्या लशीला उणे ७० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते.
प्रतिपिंड निर्मिती
वायरसेज या विज्ञानविषयक नियतकालिकात या लशीबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या लशीचे उंदरांवर प्रयोग करण्यात आले. त्यावेळी डेल्टा व ओमिक्रॉन या प्रकारांवरही ती प्रभावी असल्याचे दिसून आले. उंदरांच्या शरीरात प्रतिपिंडे (अँटिबॉडी) तयार झाली. कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रतिकारक्षमता उंदरांच्या शरीरात निर्माण झाल्याचेही दिसून आले. या लशीच्या चाचण्या यशस्वी झाल्या तर उष्ण हवामान असलेल्या देशांत, तसेच लशीच्या साठवणुकीसाठी `कोल्ड चेन` तयार करू न शकणाऱ्या गरीब देशांमध्ये ही लस वापरता येऊ शकेल.
Web Title: Indian Vaccine Withstand High Temperatures Vaccine Effective Against Delta Omicron Corona
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..