Indian women ambassadors Good day the Female Foreign Secretary
Indian women ambassadors Good day the Female Foreign Secretarysakal

महिला राजदूतांना आले चांगले दिवस; झालेत 'हे' महत्त्वाचे बदल

जेव्हा एखादी स्त्री परराष्ट्र सचिव पदापर्यंत पोहोचते, तेव्हा ``शी हॅज ब्रोकन द सिलिंग’’ असं वर्णन केले जाते

भारतीय परराष्ट्र सेवेत महिला राजदूतांना चांगले दिवस आले आहेत. पारंपारिक दृष्ट्या परराष्ट्र सेवा ही पुरुषप्रधान सेवा आहे. परंतु, जेव्हा एखादी स्त्री परराष्ट्र सचिव पदापर्यंत पोहोचते, तेव्हा ``शी हॅज ब्रोकन द सिलिंग’’ असं वर्णन केले जाते. गेल्या काही वर्षात चोकिला अय्यर, निरूपमा राव व सुजाता सिंग या तीन महिला भारताच्या परराष्ट्र सचिव झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कारकीर्दीत कै सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रीपदाचा पदाचा कारभार अत्यंत कार्यक्षमतेने चालविला. मोदी हे पंतप्रधान म्हणून परराष्ट्राची सूत्रे हलवित होते, तरी महिला परराष्ट्र मंत्री म्हणून त्या देशविदेशात लोकप्रिय झाल्या.

महिला राजदूतांना चांगले दिवस आले आहेत, हे अलीकडे `पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया’ उर्फ माजी राजदूत व परदेशस्थ भारतीयांच्या खात्याचे माजी सचिव ज्ञानेश्र्वर मुळे यांनी फेसबुकवर दिलेल्या माहितीमुळे दिसते. त्यांनी विद्यमान महिला राजदूतांची त्यांच्या छायाचित्रांसह माहिती देऊन शिष्टाई वा मुत्सद्देगिरी क्षेत्राची एक प्रकारे सेवा केली असून, त्या विषयाचे अध्ययन करणाऱ्यांच्या ज्ञानात आणखी भर घातली आहे. त्याबाबत त्यांचे आभार मानायला हवे.

या महिला राजदूतांमध्ये त्यांनी सोळा महिलांचा समावेश केला आहे. अंगोलामध्ये श्रीमती प्रतिभा परकार राजनम, श्रीमती रूचिरा कंभोज (भूतान), श्रीमती देवयानी खोब्रागडे (कंबोडिया), श्रीमती मधुमिता हजारिका भगत (सायप्रस), श्रीमती पूजा कपूर (डेनमार्क), डॉ मीना मलहोत्रा (इटली), श्रीमती शुभदर्शिनी त्रिपाठी ( कझाखस्तान), श्रीमती सुप्रिया रंगनाथन (दक्षिण कोरिया), श्रीमती संगीता बहादूर (माल्टा), श्रीमती कोथ्थापल्ली नंदिनी सिंगला (मॉरिशस), श्रीमती नगमा मलिक (पोलंड), श्रीमती नम्रता सतदेवे कुमार (स्लोव्हेनिया), श्रीमती रुचिरा दुराय (थायलँड), श्रीमती गायत्री इसार कुमार (ब्रिटन), श्रीमती राधा व्यंकटरमन (इस्वातिनी) व नियोजित राजदूत रीनत संधू ( द नेदरलँड्स) त्या होत. या व्यतिरिक्त निरनिराळ्या देशात राजदूतपदी असलेल्या स्वित्झरलँडमधील मोनिका कपिल मोहता यांचाही समावेश करावा लागेल.

राजदूत म्हणून महिला उत्तम काम करू शकत नाही, हा पूर्वापार चालत आलेला पूर्वग्रह आता झटकून टाकायला हवा. कारण जागतिक शिष्टाईच्या क्षेत्राकडे पाहिल्यास देशाचे पंतप्रधानपद वा अध्यक्षपद राखून परराष्ट्र मंत्रालयाचे सुकाणू चालविणाऱ्यात तब्बल 125 महिलांचा समावेश होतो.

शिवाय परराष्ट्र मंत्री म्हणून अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री कोंडोलीसा राईस, मॅडलीन ऑलब्राईट व हिलरी क्लिंटन यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांच्या नियुक्तीने देशविदेशातील राष्ट्रप्रमुखांना राजदूतांच्या पदी महिलांची नियुक्ती करण्यास प्रोत्साहन मिळाले. या संदर्भात मी माझ्या `साऊथ ब्लॉक, नवी दिल्ली, शिष्टाईचे अंतरंग’ या पुस्तकात माहिती दिली आहे. भारताच्या पहिल्या महिला राजदूत होत्या. माजी पंतप्रधान पंडित नेहरूनी यांनी भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांची नेमणूक भारताच्या रशियातील राजदूतपदी केली होती. परंतु, त्यांना हे पद मिळण्यास नेहरूंचे राजकारणातील महत्व व पंतप्रधानपद कारणीभूत होते. नेमणूक राजकीय स्वरूपाची होती. परंतु, भारतीय परराष्ट्र सेवेत महिला म्हणून प्रथम प्रवेश करणाऱ्या चोनिरा बेलिअप्पा मुथम्मा यांना पुरुषप्रधान मंत्रालयाचा पूर्वग्रह खोडून काढण्यास मंत्रालयांतर्गत बराच संघर्ष करावा लागला. सेवेत प्रवेश करून राजदूतपदापर्यंत पोहोचणाऱ्या पहिल्या महिला म्हणून सी.बी. मुथम्मा यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी परराष्ट्र सेवेत असताना रंगून, लंडन, पाकिस्तान व अमेरिका या देशातील दूतावासात अऩेक जबाबदाऱ्या संभाळल्या. त्या भारताच्या हंगेरी, घाना व द नेदरलँड्स येथे राजदूत होत्या. भारताचे राष्ट्रसंघातील कायमचे माजी प्रतिनिधी व विद्यमान केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची पत्नी लक्ष्मी मुर्डेश्वर या महिला विषयक विभागाच्या राष्ट्रसंघातील असिस्टंट सेक्रेटरी जनरल होत्या. हे पाहता भारतीय परराष्ट्र सेवा असो, की राष्ट्रसंघ, त्यातून भारतीय महिलांनी उल्लेखनीय कामगिरी बजावल्याचे दिसते.

माजी परराष्ट्र सचिव निरूपमा राव यांनी तर सेवेत असताना अमेरिका, चीन व श्रीलंका या तीमन महत्वाच्या देशात राजदूतपदाची जबाबदारी संभाळली आहे. त्यांच्यानंतर मीरा शंकर यांची अमेरिकेतील नियुक्ती करण्यात आली होती.

येथे माझ्या वरील पुस्तकातील संबंधित विषय़ावरील एक परिच्छेद देत आहे. 1989-93 ज्युलिया छांग ब्लोछ या अमेरिकेच्या नेपाळमधील राजदूत होत्या. त्यांनी `अँम्बँसडर्स रिव्ह्यू’ या नियककालिकात महिला व शिष्टाई हा लेख लिहिला आहे. त्यात विषयाचा उहापोह करताना त्या म्हणतात, की पुरूषी वर्चस्वाला भेद देऊन अनेक महिला आज अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचं नेतृत्व करताना दिसतात. उलट 1970 च्या दशकात या खात्यातील त्यांचं प्रमाण केवळ 4.8 टक्के होतं. अध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी 1949 मध्ये डेन्मार्कमध्ये नियुक्त केलेल्या ल्यूजीन अँडरसन या पहिल्या अमेरिकन महिला राजदूत होतं. तेव्हापासून अमेरिकेने 184 महिलांना राजदूतपदी नेमलं आहे. ज्युलिया ब्लोछ यांची नियुक्ती झाली, तेव्हा, महिला राजदूतांचं प्रमाण सात टक्के झालं. 2005 च्या सुमारास अमेरिकेच्या एकूण 167 राजदूतांपैकी 30 महिला राजदूत होत्या, तेव्हा हे प्रमाण 18 टक्के झालं. त्यावेळी राष्ट्रसंघात आठ देशांनी महिला राजदूतांना कायमच्या प्रतिनिधीपदी नेमलं होतं. तत्पूर्वी, 2002 मध्ये त्यांची संख्या 12 होती. जगातील राष्ट्रांची एकूण 193 संख्या पाहता, राष्ट्रसंघातील महिला राजदूतांचं प्रमाण सुमारे 4 टक्के आहे. 1933 सालापर्यंत महिलांना राजदूतीय सेवेत प्रवेश मिळणं कठीण असे. तरीही निकारागुआ, तुर्कस्तान आदी 13 देशांनी महिलांना राजदूत नेमलं. 1924 मध्ये परराष्ट्र खात्यात गुणवत्तेवर आधारित परिक्षा होऊ लागल्या, तेव्हापासून महिलांना दालनं खुली झाली. ब्लोछ म्हणतात, की अमेरिकन परराष्ट्र खातं स्थापन होऊन केवळ 80 वर्ष उलटली आहेत. त्यात पहिली महिला राजदूत नेमण्यास 25 वर्ष, पहिली आशियन अमेरिकन राजदूत नेमण्यास 65 वर्ष व पहिली परराष्ट्र मंत्री (मॅडलीन ऑलब्राइट) नेमण्यास 72 वर्ष उलटावी लागली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष असताना भारतीय वंशाच्या निकी हेले यांना राष्ट्रसंघातील कायमच्या प्रनिनिधीपदी नेमलं होतं. तर अध्यक्ष ज्यो बायडन यांच्या कारकीर्दीत आफ्रिकी वंशाच्या अमेरिकन राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफील्ड यांना राष्ट्रसंघातील कायमच्या प्रतिनिधीपदी नेमलं आहे. भारतातही परराष्ट्र सेवेतील महिलांचं महत्व वाढत असून, त्या बजावित असलेल्या कामगिरीचा चढता आलेख दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com